- अजित मांडके, ठाणेधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. विरोधी पक्षातील बाकावर बसलेले अनेक इच्छुक आजी-माजी आमदार हे आता शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. त्यात भाजपने गणेश नाईक अॅण्ड फॅमिलीचा मोठा मासा गळाला लावल्याने त्याचे परिणाम काँग्रेस आणि राष्टÑवादीला येत्या काळात भोगावे लागणार आहे. त्यातही नाईक भाजपमध्ये जाण्याआधीच राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. नाईक यांच्यामुळे केवळ कॉंग्रेस, राष्टÑवादी नाही तर, शिवसेनेच्या तोंडचेही पाणी पळण्याची शक्यता आहे.आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपमध्ये मेगाभरती सुरू झाली आहे. साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून विरोधी बाकावरील आमदाराला आपल्या पक्षात आणण्याची जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेनेतही आता इनकमिंग सुरू झाले आहे. सागर नाईक आणि संदीप नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी, येत्या काही दिवसांत गणेश नाईक जिल्ह्यातील लवाजमा घेऊन जंगी प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. एकेकाळी नाईकांनी संपूर्ण जिल्ह्यावर आपले प्रभुत्व सिद्ध केले होते. आता नव्याने त्यांना ही संधी मिळणार आहे. निमित्त मात्र भाजपचे ठरणार आहे.नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. मागील पाच वर्षांपासूनच नाईकांनी राष्टÑवादीला खड्ड्यांत घालण्याचे कारस्थान रचले असल्याचा थेट आरोपच त्यांनी केला. त्यामुळे आता त्याचा सूड घेण्यासाठीही नाईक यानिमित्ताने सज्ज होत असल्याचे बोलले जात आहे. नाईक यांचा स्वाभिमान दुखावला तर ते काही करू शकतात, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे आता आव्हाडांनी थेट त्यांच्या जिव्हारी लागणारे विधान केल्याने येत्या काळात त्याचे पडसाद उमटणार, हे निश्चित. नाईक यांचा पूर्वीपासून ठाण्यासह कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदर तसेच ग्रामीण भागात वरचष्मा आहे. त्यामुळे आता त्याचा फायदा त्यांना भाजपमध्ये गेल्यानंतर होणार आहे. जिल्ह्यातील राष्टÑवादीला सुरुंग लावण्याचे काम ते यानिमित्ताने करतील, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.शिवाय, शिवसेनेलाही येत्या काळात नाईक फॅमिली घाम फोडणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. नाईक यांनी यापूर्वीही पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कारभार हाकला आहे. जनतादरबाराच्या माध्यमातून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे आता भाजपच्या कोट्यातून आमदारकी मिळवल्यानंतर त्यांच्या खांद्यावरच पालकमंत्रीपदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे. यामागे भाजपची आणखी एक वेगळी रणनीती असल्याचेही बोलले जात आहे. नाईकांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या अस्तित्वाला खिंडार लावण्याची तयारीही यानिमित्ताने सुरू झाल्याचे बोलले जात आहे. एकीकडे नाईक तर दुसरीकडे त्यांच्या दिमतीला पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, किसन कथोरे यांची ताकद आली आहे.आता शिवसेनेकडूनही सावध भूमिका घेतली जात असून भाजपची ही खेळी हाणून पाडण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवण्याची तयारी शिवसेनेने सुरू केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार संजय केळकर यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील अनेकांनी रणशिंग फुंकले आहे. केळकर यांच्याऐवजी आपल्याला तिकीट मिळावे, यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला या मतदारसंघात मुळमुळीत आमदार नको असल्याचे बोलले जात आहे. खमक्या वेळप्रसंगी पक्षावर ओढवलेल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी असलेले नेतृत्व हवे आहे. त्यामुळे त्याची तयारीही यानिमित्ताने सुरू झाली आहे. भाजपच्याच वरिष्ठांनी अशी भूमिका घेतली असल्याने स्थानिक पातळीवरील नारायण पवार, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले यांच्यासह अन्य तिघे या स्पर्धेेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे याचा फायदा घेत शिवसेनेनेही या जागेवर आपला दावा सुरू केला आहे. त्यामुळे येथे आता शिवसेनेकडून दोन नावांची चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, नाईक यांना हाताशी धरून जिल्ह्यात संपण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेस, राष्टÑवादीला अखेरची घरघर लावण्याची तयारी सुरू झाली आहे. ठाण्यात राष्टÑवादीचे ३५ नगरसेवक आहेत. यामधील आणखी किती नगरसेवक आपल्या गळाला लागू शकतात, याची चाचपणी नाईक कुटुंबीयांकडून सुरू झाली आहे.दुसरीकडे राष्टÑवादीची दुखरी नस पकडून शिवसेनेनेही राष्टÑवादीच्या विद्यमान पाच ते सात नगरसेवकांना शिवबंधन बांधण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु, हे नगरसेवक युती होणार की नाही, याचा विचार करत असून त्यानुसार पुढील दिशा ठरवणार आहे.मोठी राजकीय उलथापालथएकूणच येत्या महिनाभरात ठाण्यात अनेक राजकीय उलथापालथी होऊन सर्वाधिक फटका हा राष्टÑवादीलाच बसणार, हे स्पष्ट आहे.
नाईकांच्या प्रवेशाने अनेक पक्षी मारले जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 1:58 AM