लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिका आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करण्यासाठी ठाण्याची जबाबदारी भाजपने वनमंत्री गणेश नाईक यांच्या खांद्यावर सोपवली. ठाणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देत ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा नाईक यांनी मंगळवारी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी मतदारसंघातील कार्यक्रमात नाईक यांनी ही घोषणा केल्याने ठाण्यात नाईक विरूध्द शिंदे असा सामना रंगणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
शिंदेसेनेकडून आगामी सर्वच निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढण्याचे संकेत दिले जात आहेत. परंतु, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह आता मंत्री नाईक यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिंदेसेना आणि भाजपची युती होणार की नाही, अशी चर्चा आहे.
यापूर्वी दोन नेत्यांमध्ये काय घडले होते?ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी नाईक यांच्या खांद्यावर दिली आहे. नाईक आणि शिंदे यांचे यापूर्वीदेखील पटले नव्हते. लोकसभा निवडणुकीत नाईक यांनी शिंदे यांच्या विरोधात थेट नाराजी व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही नाईक यांच्या विरोधात ऐरोली मतदारसंघात अपक्ष म्हणून शिंदेसेनेचे विजय चौगुले हे रिंगणात उतरविण्यात आले होते. परंतु, शिंदेसेनेने चौगुले यांच्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई केली नाही. त्यामुळे नाईक नाराज झाले.
... म्हणूनच ठाण्याची जबाबदारी माझ्यावर!ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरून शिंदे व नाईक यांच्यात रस्सीखेच होती. अखेर पालघर जिल्ह्याची जबाबदारी नाईक यांच्यावर सोपविण्यात आली. ठाण्यातील सत्काराच्या कार्यक्रमात नाईक यांनी आगामी महापालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल आणि ठाणे महापालिकेवर कमळ फुलवेल, असे जाहीर केले. त्यासाठीच ठाण्याची जबाबदारी ही माझ्या खांद्यावर देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा जनता दरबार घेण्याची घोषणा करून त्यांनी शिंदे यांनाच थेट आव्हान दिले.
महायुतीमधील प्रत्येक मंत्री हे जनतेसमोर जात आहेत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने एखादा मंत्री काही करत असेल तर त्यात काहीच वावगे नाही.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेतला, तर शिंदेसेनेचे मंत्री पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेतील. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. सर्वांनी महायुतीचा धर्म पाळावा.नरेश म्हस्के, खासदार, ठाणे