ठाणे : कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता यंदाही गणेशोत्सव शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार साजरा करावा. गणेशमूर्ती या ४ फूट उंचीच्या व प्राधान्याने शाडूच्या असाव्यात, तसेच कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन गणेश मंडळांना भाड्यामध्ये विशेष सवलत देऊन मूर्तिकारांना महापालिकेच्या मोकळ्या जागा तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून देण्याच्या सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी मंगळवारी प्रशासनाला दिल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक मंगळवारी आयोजिली होती. या बैठकीला उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, अग्निशमन विभागाचे एस. वी. देवरे, प्रदूषण नियंत्रण विभागाच्या विद्या सावंत व ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत उपस्थित होते.
गणेश मंडळांना नोंदणी सुलभ व्हावी, यासाठी एक खिडकी योजना राबविणे व अग्निशामक विभागाकडून घेण्यात येणारे पाच हजार रुपये शुल्क माफ करण्यात यावे, असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे मूर्तिकारांचीदेखील आर्थिक गणिते कोलमडली आहेत, अशा वेळी महापौरांनी मूर्तिकार व मंडळांना असलेल्या समस्या सोडवून त्यांना दिलासा दिल्याने ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी आभार व्यक्त केले.