कल्याण : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेणे सरकारने बंधनकारक केले आहे. त्यासाठी सोमवार, ३ सप्टेंबरपर्यंतच मुदत आहे. मात्र, या दिवशी गोपाळकाला आहे. कल्याण-डोंबिवलीतील अनेक मंडळे गोपाळकाला आणि गणेशोत्सवही साजरा करतात. त्यामुळे परवानगी मिळवण्यासाठी कमी अवधी असल्याने तो मंडळांसाठी एक प्रकारे डोकेदुखी ठरत आहे.
कल्याण-डोंबिवलीत साधारण ९०० च्या आसपास गणेशोत्सव मंडळे आहेत. ही मंडळे रस्त्यांवर, मैदानांमध्ये मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी महापालिका, वाहतूक शाखा, पोलीस आणि अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला आवश्यक असतो. परंतु, हे दाखले मिळवण्यासाठी लागणारा वेळ पाहता यंदाही केडीएमसीने महापालिका क्षेत्रातील आठ पोलीस ठाण्यांमध्ये एक खिडकी योजना सुरू केली आहे. या खिडक्यांवर २५ आॅगस्टपासून परवानगी देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ३ सप्टेंबरपर्यंतच चालणार आहे. त्यानंतर, आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे केडीएमसीने स्पष्ट केले आहे. परंतु, गोपाळकाला सोमवारी असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. गोविंदा थर रचण्याचा सराव करण्यात मग्न आहेत. काही मंडळे गोपाळकाला आणि गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात. त्यामुळे गोपाळकाल्यानंतरच गणेशोत्सवाच्या तयारीला प्रारंभ होणार आहे. परंतु, यंदा मंडप उभारण्यासंदर्भात परवानगी घेण्याची कार्यवाही ही गोपाळकाला उत्सवाच्या दिवसापर्यंतच राहणार असल्याने दोन्ही उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांपुढे पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे गोपाळकाला उत्सवानंतर आणखी चार ते पाच दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मंडळांची मागणी आहे. दरम्यान, आतापर्यंत अवघ्या १७ मंडळांनी मंडपांसाठी परवानग्या घेतल्या आहेत. मागील वर्षी ३६९ मंडळांनी परवानग्या घेतल्या होत्या.परवानगीचा आकडा वाढेलमुदत वाढली पाहिजे : काही मंडळे गोपाळकाला आणि गणेशोत्सवही साजरा करतात. यंदा गोपाळकाल्यापर्यंतच गणेश मंडळांना मंडपाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे संबंधित मंडळांसाठी काही दिवस अजून मुदत वाढवून मिळणे आवश्यक आहे. साधारण ७ सप्टेंबरपर्यंत ही मुदत वाढल्यास मंडळांसाठी सोयीस्कर होईल, असे मत अष्टविनायक मित्र मंडळाचे सल्लागार प्रकाश भोईर यांनी व्यक्त केले.गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यासंदर्भात नियमावली तयार करण्यात आली आहे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या १० दिवस आधी परवानगी देणे बंद केले जाणार आहे. सध्या १७ मंडळांना मंडप उभारण्यासाठी नाहरकत दाखला दिला असला तरी अन्य अर्जांवर कार्यवाही सुरू आहे. हा आकडा पुढे वाढेल, अशी माहिती बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाचे सहायक आयुक्त सुहास गुप्ते यांनी दिली.