डोंबिवली : भरपावसात दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देऊन घरी परतलेल्या ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर येथील गणेशभक्तांची बुधवारी सकाळपासून झालेल्या पावसामुळे रेल्वेसेवा कमालीची विस्कळीत झाल्याने अक्षरश: सत्त्वपरीक्षा पाहिली गेली. सकाळीच ठाण्याच्या पलीकडे गेलेले लक्षावधी प्रवासी रात्री उशिरापर्यंत घरी परतले नव्हते, तर ठाणे ते कर्जत-कसारादरम्यान सुरू असलेल्या लोकलमधून ठाणे ते कल्याण या प्रवासाकरिता तब्बल पाच तास लागत होते. रेल्वे प्रशासनाच्या बेमूर्वतखोर कारभाराचा संतापजनक अनुभव यंदाच्या पावसाळ्यात पुन:पुन्हा घेतल्याने आता हा पाऊस आणि मध्य रेल्वेचे भिकार प्रशासन गणराया आवरा, अशी संतापाची भावना प्रवाशांमध्ये व्यक्त होत आहे.
मंगळवारी संध्याकाळी गणेश विसर्जन मिरवणुका सुरू असतानाच धो-धो कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी पहाटे आपला जोर कायम राखल्याने पहाटेपासून मध्य रेल्वेची सेवा अर्धा तास विलंबाने सुरू होती. घरोघर गणपती असल्याने रविवारला जोडून दोन दिवसांची सुटी झाल्याने बुधवारी कामावर जाणे अपरिहार्य असल्याने अनेकांनी सकाळीच रेल्वेस्थानक गाठले. प्रचंड गर्दीच्या लोकलमध्ये कसेबसे घुसून कार्यालय गाठले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ठाणे ते सीएसएमटी लोकलसेवा ठप्प झाली. भांडुप, कांजुरमार्ग, कुर्ला व शीव या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेरुळांवर पाणी साचल्याने रेल्वेगाड्यांची वाहतूक ठप्प झाली. अगोदरच लोकल उशिरा धावत असल्याने अनेकांचा सलग तीन दिवसांच्या सुटीनंतर लेटमार्क झाला असताना रेल्वेसेवा ठप्प झाल्याने त्यांच्या हालअपेष्टांना पारावार उरला नाही. अनेक कार्यालयांनी यंदाच्या २६ जुलै रोजीच्या अतिवृष्टीचा धडा घेतलेला असल्याने कार्यालये सोडून दिली. त्यामुळे ठाण्याच्या पुढे राहणाºया लक्षावधी प्रवाशांना दुपारनंतर रेल्वेस्थानकांवर बंद पडलेल्या लोकल पाहत व रेल्वेरुळांवरील पाण्याचा निचरा होण्याची वाट पाहत थांबावे लागले. ओला, उबरसारख्या खासगी टॅक्सी सर्व्हिस देणाºया कंपन्या दादर ते ठाणे या प्रवासाकरिता १८०० ते २५०० रुपये भाडे आकारत होत्या. असंख्य वाहनांची गर्दी झाल्याने पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ठाणे ते कल्याण किंवा त्यापुढील प्रवासाकरिता किमान पाच तास लागत होते.
ठाणे-कल्याण मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येत असल्या तरी त्यांचा कालावधी अनिश्चित होता. दुपारी १२.५३ वाजण्याच्या सुमारास लोकल डोंबिवलीतून ठाण्याकडे गेल्यानंतर सव्वादोनच्या सुमारास दुसरी लोकल आल्याची माहिती सांगण्यात आली. त्यातच, मुंब्रा रेल्वेस्थानकापाशी काही तांत्रिक कारणांमुळे लोकलचा खोळंबा झाला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाने त्याला दुजोरा दिला नाही.ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-३ वर कल्याण दिशेकडून लोकल येत होती व तीच पुन्हा कल्याणकडे सोडली जात होती. त्यामुळे एकामागोमाग लोकलची रांग लागल्याने मुंब्रा ते ठाणे यादरम्यान लोकलची प्रचंड रखडपट्टी सुरू होती. कल्याण-कर्जतवरून आलेले प्रवासी व ठाणे स्थानकात लोकलमध्ये प्रवेश करू पाहणारे प्रवासी यांच्यात धक्काबुक्की, मारामारी होण्याचे प्रसंग वरचेवर येत होते. ठाणे स्थानकात सायंकाळच्या सुमारास गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन प्रवासी फलाटावर पडल्याचे समजते. मात्र, पोलिसांनी त्याला दुजोरा दिला नाही. ठाणे स्थानकात इतके फलाट असताना केवळ तीन क्रमांकाच्या फलाटावरूनच लोकलची वाहतूक का सुरू होती, असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला.
ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर मुजोर रिक्षावाल्याच्या बेशिस्त कारभाराला ऊत आला होता. दररोज प्रवाशांकरिता उभे असलेले युनियनचे पदाधिकारी व वाहतूक पोलीस हेही गायब होते. शेअर रिक्षा जेथे उभ्या असतात, तेथेही प्रचंड कोलाहल सुरू होता.मुंबईहून ठाण्याच्या पुढे लोकलसेवा सुरू झाली नसल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. ठाणे स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्या उभ्या केल्या होत्या. काल रात्रीपासून प्रवास करून आलेले शेकडो प्रवासी या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये दिवसभर तिष्ठत होते.अनेकजण गणेशोत्सवाकरिता आपल्या गावी गेले होते. विसर्जन करून त्यांनी मुंबईकडे परतण्याकरिता लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडल्या होत्या. त्यांचेही या गोंधळात प्रचंड हाल झाले. ज्यांना रस्तेमार्गाने प्रवास करणे शक्य होते, त्यांनी त्या गाड्या सोडून घराकडचा प्रवास केला.मात्र, घोडबंदर मार्गावर पाणी असल्याने बोरिवलीकडील वाहतूक ठप्प असल्याने पश्चिम उपनगरांत राहणाºया अनेक प्रवाशांना त्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्येच अडकून पडावे लागले. रेल्वे प्रशासन, राज्य शासन यांच्यात समन्वय नसल्याने प्रवाशांना त्रास होत असल्याची टीका प्रवासी संघटनांनी केली.