डोंबिवली : डोंबिवली शहर आणि २७ गावांमध्ये सोमवार रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची मंगळवारीही संततधार कायम होती. दुुपारी ४ नंतर सोसाट्याचा वारा आणि पाऊस, यामुळे जीवन विस्कळीत झाले. आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी अग्निशमन दल सज्ज असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. दुपारपर्यंत एका ठिकाणी झाड पडल्याची घटना घडली होती.पावसामुळे बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांची मात्र प्रचंड गैरसोय झाली. मंडपामधील पाणी गळती रोखताना गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची तारेवरची कसरत झाली. पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन आणि सकाळी आसनगावनजीक दुरोंतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातामुळे मंगळवारी अनेकांनी घरीच राहणे पसंत केले होते. काहींनी दुपारच्या वेळात पावसाचा जोर कमी झाल्याचा पाहून विसर्जन केले. मात्र, विसर्जन करण्यासाठी खाडीकिनारी व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी तुलनेने कमी गर्दी आढळून आली.बुधवारी असलेल्या गौरीपूजनामुळे मंगळवारी सकाळी बाजारात भाजी व मिठाई खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली होती. सणासुदीचे दिवस असतानाही प्रचंड पावसामुळे ठिकठिकाणच्या रिक्षा स्टॅण्डवर एरव्हीच्या तुलनेने कमी रिक्षा आढळून आल्या. गणेश विसर्जनासाठी काहींनी रिक्षा व अन्य वाहने आधीपासूनच बुक करून ठेवल्याने गणेशभक्तांची गैरसोय टळली. सायंकाळी पावसामुळे मात्र पूरसदृश स्थिती निर्माण झाली. बहुतांशी सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारांमधील पाणी शिरल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल झाले.डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात डॉ. राथ रोड, पाटकर रोड, एमआयडीसीत एमआयडीसी विभागीय कार्यालय, महावितरण कार्यालय परिसरात, कोपर रोड, कोपर गाव आदी भागातील रस्त्यांवर प्रचंड पाणी जमा झाले होते. त्यामुळे तेथून वाट काढताना वाहनचालकाना त्रास झाला. खड्डे पाण्यांनी भरल्याने वाहने आदळण्याच्या घटना घडल्या. पश्चिमेला कुंभारखण पाडा येथे पावसाचे पाणी जमा झाल्याने नागरिकांचे हाल झाले.भिवंडीत पाणी तुंबलेभिवंडी : भिवंडीत मंगळवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने शहर आणि ग्रामीण भागात पावसाचे पाणी साचले. खड्यांमुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने दुपारनंतर जोर पकडला. पाण्याच्या प्रवाहाचा निचरा न झाल्याने शहरातील ठाणे रोड मार्गावरील गौरीपाडा, वासंतीबाग ते पायल टॉकीज,कणेरी भागातील महेश डार्इंग, कल्याणरोड, नारपोली, तीनबत्ती,अजयनगर, शिवाजीनगर, वाजा मोहल्ला या भागात पाणी साचले होते. ग्रामीण भागातील रहानाळ, हॉलीमेरी शाळा, कल्याणरोडवरील रांजनोली नाका या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे रिक्षाचालकांनी लूट केली.अंबरनाथ - बदलापूरच्या गणेशोत्सवात पावसाचे विघ्नअंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने गणेश दर्शनात मोठ्या प्रमाणात विघ्न येत आहेत. भर पावसात दर्शन घेण्याची वेळ भाविकांवर आली आहे. घरगुती गणेशाचे दर्शन घेण्यासाठीदेखील नातेवाईकांची ओढाताण होतांना दिसत आहे. अंबरनाथमध्ये सार्वजनिक गणेशोत्साचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची दरवर्षी गर्दी होत असते. मात्र, सलग ५व्या दिवशीदेखील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भाविकांनी पावसात बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. तर काहींनी भर पावसात गणेश दर्शन घेतले. मात्र, पावसामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देणाºया भाविकांचा ओघ हा दरवर्षीपेक्षा कमी झाला आहे. अनेक मंडळांच्या ठिकाणी भाविक दिसेनासे झाले आहेत. तर ज्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी भाविकांची दरवर्षी गर्दी होत होती त्या ठिकाणीदेखील यंदा गर्दींचा अभाव दिसत आहे. अंबरनाथ सोबत बदलापुरातदेखील सार्वजनिक गणेश मंडळांकडे भाविकांचा वेग मंदावला आहे. सर्वजनिक गणेशोत्सवासोबत घरगुती गणेश दर्शन घेण्यासाठी येणाºया नातेवार्इंकांनादेखील पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. पाऊस विश्रांती घेत नसल्याने घरगुती गणेशाच्या दर्शनासाठी जाणेदेखील अवघड जात आहे. पावसाने क्षणभर विश्रांती घेतल्यावर गणेश दर्शनासाठी भाविक बाहेर पडत आहेत.
डोंबिवलीतील गणेशोत्सव मंडळांचे झाले हाल , विसर्जनावरही सावट, सोसायट्यांमध्ये शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:07 AM