कल्याण : नदीतील पाण्यात विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर पुन्हा उघड्या पडतात. अशा मूर्तींचे पुन्हा विसर्जन करण्याचे काम रायता येथील रशीद शेख हा तरुण करत आहे. त्याच्या या कामाची दखल सोशल मीडियाने घेतली आहे.रायता गावात राहणारा रशीद हा रोडरोलर संघटनेचा अध्यक्ष आहे. त्याला समाजकार्याची आवड आहे. त्याने मागच्या वर्षी अतिवृष्टीत नागरिकांना मदतीचा हात दिला होता. कोरोनाकाळातही त्याने ६० पेक्षा जास्त कुटुंबांना अन्यधान्याचे वाटप केले आहे. त्याच्या १४ वर्षांच्या मुलाचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर, रशीदने मदतीचे काम सुरू ठेवलेले आहे.कल्याण-मुरबाड रोडवरील रायता पुलानजीक नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. याच पुलावरून येजा करणाऱ्या रशीद याला नदीच्या किनारी विसर्जित केलेल्या काही गणेशमूर्ती दिसल्या. नदीतील पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने त्या पुन्हा किनाºयावर आल्या होत्या. त्यामुळे रशीद याने अर्धवट विसर्जन झालेल्या मूर्तींचे पुन्हा वाहत्या खोल पाण्यात विसर्जन करून मूर्तींची विटंबना टाळण्याचे काम केले. रशीद याने केलेले काम हे उल्लेखनीय ठरत असून, सोशल मीडियावरील सामाजिक संस्थांनी त्याच्या या कामाची दखल घेतली आहे.दरम्यान, गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी प्लॅस्टर आॅफ पॅरिसएवजी शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावे तसेच मूर्तींचे विसर्जन विहीर, नदी, तलावांऐवजी कृत्रिम तलावांमध्ये करण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जाते. मात्र, अजून काही जण नदीपात्रांमध्ये मूर्तींचे विसर्जन करतात. त्यामुळे जल प्रदूषण होते. दुसरीकडे, यंदा कोरोनामुळे विसर्जनावर बंधने आल्याने अनेकांनी घरीच लहान पिंपांमध्ये मूर्तीचे विसर्जन केले. हीच परंपरा पुढे सुरू ठेवण्याची गरज आहे.
गणेशोत्सव : ‘त्या’ मूर्तींचे रशीद पुन्हा करतोय विसर्जन, सोशल मीडियाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 2:14 AM