नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव गर्दी न करता साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भिवंडीतील एकात्मतेचा राजा म्हणून गौरविल्या गेलेल्या धामणकर नाका मित्रमंडळाचा यंदाचा ३३ वा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा आरोग्य उत्सव म्हणून साजरा करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी शनिवारी कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन सभेत हा निर्णय जाहीर केला.
मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सवादरम्यान दहा दिवस रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यंदाही कोरोना असल्याने चार फुटाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून डिजिटल लेझर शोच्या माध्यमाने केलेल्या सजावटीचे गणेशभक्तांना घरबसल्या ऑनलाईन दर्शन दिले जाणार आहे. रक्तदान शिबिर, नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वितरण यांसह मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अँटिजन व आरटीपीसीआर चाचणी गणेश मंडपात केली जाणार असून गरजूंना लसीकरण उपलब्ध करून देण्याचा मानसही असल्याचे संतोष शेट्टी यांनी स्पष्ट केले.
मंडळातर्फे घेतली जाणारी भारतरत्न डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम चित्रकला स्पर्धा ही कोरोनामुळे बंद होती, परंतु विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला संधी मिळून या भयावह मानसिकतेतून त्यांना बाहेर काढावे यासाठी यंदा ऑनलाईन चित्रकला स्पर्धा तीन गटात घेतली जाणार आहे. निवडक ३० स्पर्धकांची अंतिम फेरी प्रत्यक्ष गणेश मंडपात घेण्यात येणार असून विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली. या सभेप्रसंगी सल्लागार कृष्ण गोपाल सिंग, मंडळाचे पदाधिकारी हसमुख पटेल, संजय भोईर, दिलीप पोद्दार, मोहन बल्लेवार, विजय गुज्जा, राजेश शेट्टी, तारू जाधव, रमेश पुजारी, ईश्वर पामु उपस्थित होते.