मुंब्राः पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेल्याची हत्या करण्यासाठी चाललेल्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. शहबाद उर्फ रमो सय्यद याने त्याला केलेल्या मारहाणीची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्याचा राग मनात धरून त्याची हत्या करण्यासाठी रविवारी काहीजण मुंब्र्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. परिमंडल - १मधील वरिष्ठ अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय गळवे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले आणि त्यांच्या पथकातील पोलिसांनी सापळा रचून ठाण्याच्या दिशेने आलेली एक रिक्षा रेतीबंदर परिसरात थांबवून त्यामध्ये बसलेल्या इमरान खान उर्फ बंटी घाऱ्या, मेहफूज खान, शकील खान, मोईन शेख तसेच रिक्षा चालक निजामउद्दिन शेख यांच्याकडे लाॅकडाऊनमध्ये मुंब्र्यात येण्याच्या कारणांबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पिस्तुल, तलवार, चाॅपर, चाकू यांसारखी घातक शस्त्रे आढळून आली. अधिक चौकशीअंती ते सय्यद याची हत्या करण्याच्या इराद्याने आले होते, अशी कबुली त्यांनी दिली. पाचही जणांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती कड यांनी दिली.
........
वाचली