ठाणे: गाडी चालकाला लुटण्यासाठी डोक्यात गोळी घालून त्याची हत्या करणा-या बंटी उर्फ जयसिंग ठाकूर याच्यासह सहा जणांच्या सशस्त्र टोळीला नारपोली पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले. खंडणी आणि लुटीसाठी त्यांनी खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचेही उघड झाल्याचे ठाण्याच्या पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सोमवारी सांगितले.ठाणे आणि भिवंडीतील नारपोली भागातील बांधकाम व्यवसायिक तसेच बड्या आसामींकडून खंडणी वसूलीच्या तयारीमध्ये ही टोळी होती. एका खुनी हल्ल्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव यांच्या पथकाने दुलाल मंडल (२९, रा. हायलॅन्ड हेवन, ठाणे, मूळ राहणार पश्चिम बंगाल) याला अलिकडेच अटक केली होती. त्याच्या अंगझडतीमध्ये एक पिस्टल आणि दहा जिवंत काडतुसे हस्तगत केली. याच तपासातून पुढे ठाणे ग्रामीणमधील शहापूर परिसरातील एका खुनाचाही छडा लागला. यामध्ये दलाल तसेच त्याचे अन्य साथीदार हिर उर्फ हिरामण गंगावासी (४०, रा. सिव्हील हॉस्पीटल वसाहत, ठाणे), काली उर्फ प्रमोद नुनेर (३०, रा. गांधीनगर, ठाणे),रॉय उर्फ राजेश करोतिया (३०, रा. गांधीनगर, ठाणे) आणि अंजू उर्फ प्रभाकर सिंग (३०, रा. तुळशीधाम, ठाणे) यांना अटक केली. त्यांना १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. आरोपींपैकी हिरु उर्फ हिरामण याच्या घरातून एक पिस्टल, दहा जिवंत काडतुसे, तीन चॉपर आणि एक सुरी तर रॉय याच्या घरातून एक पिस्टल, दहा जिवंत काडतुसे असे चार पिस्टल, ३१ जिवंत काडतुसे, कार, चोरीच्या दोन मोटरसायकली, तीन चॉपर, एक सुरी आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.एका वाहन विक्रीतील कमिशनवरुन अर्जून सरकार (३२) याच्या खुनाचा प्रयत्न त्याच्या नातेवाईकाने कशेळी पाईपलाईन येथे केला होता. याप्रकरणी ६ डिसेंबर २०१८ रोजी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. अर्जून याच्यावर गोळीबारही झाल्याचे चौकशीत समोर आले होते. याच गुन्ह्याच्या चौकशीमध्ये दुलाल मंडल याला ७ डिसेंबर रोजी तर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ८ डिसेंबर रोजी यातील मुख्य सूत्रधार बंटी उर्फ जयसिंग ठाकूर याला अटक करण्यात आली. बंटी ठाकूर, दुलाल मंडल आणि अंजू उर्फ प्रभाकर ठाकूर यांनी २३ नोव्हेंबर २०१८ रोजी माजीवडा येथून चार हजार रुपये भाड्याने एक कार घेतली. पुढे कसारा घाटानंतर चांदा गावाजवळ, शहापूर परिसरात अरविंद दीक्षित या चालकाकडून गाडी घेण्यासाठी जयसिंगने डोक्यात गोळी झाडून त्याचा खून केला. याप्रकरणी शहापूर पोलिसांकडूनही तपास सुरु आहे. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्हयात ९ डिसेंबर रोजी या टोळीला अटक केल्यानंतर चौकशीत या टोळीला चालकाच्या खून प्रकरणात १० डिसेंबर रोजी अटक केल्याची माहिती चौधरी यांनी दिली. भिवंडीचे पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांचे पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
लुटमारीसाठी खून, खूनाचा प्रयत्न करणारी सशस्त्र टोळी भिवंडीत जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 10:36 PM
भाडयाने घेतलेल्या गाडीच्या चालकाला लुटीसाठी त्याचे अपहरण करुन नंतर शहापूरजवळ त्याच्या डोक्यात गोळी घालून खून करणाऱ्या सशस्त्र टोळीला भिवंडीच्या नारपोली पोलिसांनी जेरबंद केली आहे. बिल्डर आणि बडया असामींना पिस्तूलाच्या धाकावर खंडणी वसूलीच्या तयारीत असतांना त्यांना जेरबंद करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे नारपोली पोलिसांनी लावला छडा खूनी हल्ल्याच्या तपासात उघड झाला खूनाचा गुन्हा डोक्यात गोळी घालून केला कार चालकाचा खून