ठाणे - वेगवेगळ्या गुन्ह्यात कारागृहात बंदिवान असलेल्या आरोपींना बनावट कागदपत्रांच्या आधारे जामिनावर सोडविण्याचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या तिघांना उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या त्रिकुटाने तब्बल १२५ ते १५० विविध गुन्ह्यातील आरोपींना बोगस दस्तावेजावर सोडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस बनावट दस्तावेजावर सुटलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत. या त्रिकुटापैकी एका आरोपीकडून ४५ रबरी स्टॅम्प, ५१ रेशनकार्ड, ३१८ ग्रामपंचायतीच्या कर पावत्या, बनावट आधारकार्ड असा बनावट दस्तावेज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पोलीस पथकाने पाळत ठेवून सापळा रचून या त्रिकुटाला बनावट दस्तावेजांसह अटक केली. विविध गंभीर गुन्ह्यात असलेल्या आरोपींना जामीन देण्यासाठी गरजेची असलेली रेशनींग कार्ड, आधार कार्ड, घराची कर पावती अशी विविध बनावट दस्तावेज हे आरोपी तयार करीत होते. जामीनदारास पैशाचे आमिष दाखवून त्याच्या पॅनकार्डच्या आधारे रेशनिंग कार्डवर कुटुंबप्रमुख म्हणून नाव लिहून संबंधित कार्यालयातील बनावट शिक्के मारून दस्तावेज तयार करीत होते. तयार केलेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे ती खरी असल्याचे भासवून न्यायालयाची फसवणूक करीत आरोपींची जामीनावर सुटका करण्याचा गोरखधंदा सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दिपक देवराज यांनी दिली.