जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: हर्बल आयुर्वेदिक गाेळयांच्या नावाखाली भांग मिश्रीत अमली पदार्थाच्या गाेळयांची रेल्वेतून तस्करी करणाऱ्या अकवर हसन इक्बाल हसन खान या सूत्रधारासह १६ जणांच्या टाेळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चार पथकांनी जेरबंद केल्याची माहिती काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी बुधवारी दिली. या टाेळीकडून आठ वाहनांसह उत्तरप्रदेशात बनविण्यात आलेला भाग मिश्रीत पदार्थाचा यामध्ये पाच लाख ३९ हजारांचा ४३५ किलाेग्रॅम गांजा तसेच आठ वाहनांसह ४२ लाख ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
महाकाल मुनकावटी या नावाने हर्बल आयुर्वेदिक गाेळयांच्या नावाखाली उत्तरप्रदेशात बनविण्यात आलेल्या भांग मिश्रीत अमली पदार्थाच्या गाेळयांची मुंबईतील बांद्रा रेल्वे जंक्शन येथून मुंबईतील खेरवाडी तसेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण डाेंबिवली भागात माेठया प्रमाणात विक्री हाेत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली हाेती. त्याच आधारे उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली २ सप्टेंबर २०२४ राेजी मुंबईतील बांद्रा रेल्वे जंक्शन भागात काेकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्यासह चार पथकांनी सापळा लावला.
याच धाडसत्रात तीन टेम्पाेमधून भांगेच्या या गाेळयांचा साठा हस्तगत केला. यामध्ये शेख याच्यासह सहा जणाना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याच चाैकशीमध्ये यातील सूत्रधार अकबर खान याला अटक करुन त्याच्याकडूनही यातील काही साठा हस्तगत केला. त्यानंतर अन्य एका पथकाने िभवंडीत छापा टाकून भरत चौधरी अटक केली. तिसऱ्या पथकाने ठाण्यातील मानपाडा भागातून गणाराम चौधरी आणि विजेशकुमार गुप्ता यांच्याकडूनही काही साठा हस्तगत केला. पुढील चाैकशीमध्ये चाैथ्या पथकाने मुंबईच्या बाेरीवली भागातून सचिन गौड, शुभम चौरसिया यांनाही अटक केली. त्याच्या चाैकशीमध्ये आणखी तिघांना मुंबईतूनच अटक केली. त्यानंतर ३ सप्टेंबर राेजी मुंब्रा भागात छापा टाकून सुदर्शन यादव याची धरपकड करण्यात आली.