उल्हासनगर : भारत गंगोत्री यांच्या बंडखोरीने ओमी कलानी व कुमार आयलानी यांच्या टेन्शन मध्ये वाढ होऊन सिंधी मते विभागण्याची भीती व्यक्त होत आहे. एकूण १९ उमेदवार रिंगणात असलेतरी खरी लढत कलानी, आयलानी, भारत गंगोत्री, मनसेचे भगवान भालेराव व वंचितचे संजय गुप्ता यांच्यात होणार असल्याची शक्यता आहे.
उल्हासनगर सिंधी बहुल मतदारसंघ असून आजपर्यंत सिंधी समाजाचा उमेदवार निवडून आला. मात्र यावेळी चित्र वेगळे असून सिंधी विरुद्ध नॉनसिंधी असा सामना होण्याची शक्यता आहे. मतदारसंघात ४० टक्के सिंधी समाज असलातरी मतदान करण्यासाठी सिंधी समाज पूर्ण शक्तींनीशी बाहेर पडत नाही. तर नॉनसिंधी समाजाची संख्या ६० टक्क्यावर गेल्याने, नॉनसिंधी आमदार हवा. अशी मागणी होत आहे. यापूर्वी सिंधी समाजासह नॉनसिंधी समाज आयलानी व कलानी यांच्या मागे उभा राहिला. मात्र या निवडणुकीत आयलानी, कलानी व गंगोत्री यांच्यात सिंधी मतदारांची विभागणी होणार असून नॉनसिंधी समाज कोणाच्या पाठीमागे उभे राहतो. यावर कलानी व आयलानी यांचा जय पराजय निश्चित होणार आहे.
महाविकास आघाडीचे ओमी कलानी व महायुतीचे कुमार आयलानी यांच्यात खरी लढत असलेतरी भारत गंगोत्री यांच्यासह मनसेचे भगवान भालेराव व वंचितचे संजय गुप्ता यांच्यात खरी लढत आहे. मराठी व उत्तर भारतीय मतांसह मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका वठविणार आहेत. तर दलितांचे एकगठ्ठा मते ज्यांच्या पारड्यात पडणार त्याचा विजय निश्चित मानला जात आहे. भाजप व शिंदेसेनेत मुख्यमंत्री यांच्यावरील टिकेने वितुष्ट आले असून अजित पवार गटाचे अस्तित्व प्रभावी नाही. त्यामुळे आयलानी यांची कोंडी झाली. तर ओमी कलानी यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून ओमी दुपार नंतर उठतो. असा प्रचार कलानी विरोधक करीत आहेत. तर वंचितचे उमेदवार गुप्ता हे उत्तर भारतीय व दलित कार्ड खेळत असून मनसेचे भगवान भालेराव यांनी मराठी चेहरा कार्ड पुढे आणले आहे.