ठाणे : दुर्मीळ खवल्या मांजराची तस्करी करण्यासाठी आलेल्या देवजी सावंत (४२), संजय भोसले (४६) आणि रामदास पाटील (५६) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने शुक्रवारी पहाटे अटक केली. त्यांच्याकडून ४० लाखांचे खवले मांजरही हस्तगत केले आहे. दरम्यान, ओएलएक्स या संकेतस्थळावर जाहिरात देऊन घुबडाची विक्री करणा-या शम्मी सय्यद यालाही ठाण्याच्या वनविभागाने बुधवारी अटक केली असून ओएलएक्सलाही नोटीस बजावली आहे.ठाण्यातील साकेतकडून बाळकुमकडे जाणा-या रस्त्यावर ब्रिजजवळील महालक्ष्मी मंदिरासमोर एक दुर्मीळ प्रजातीचे नामशेष होत चाललेले संरक्षित वन्यजीव खवले मांजर (इंडियन पॅनगोलिन) या प्राण्याच्या विक्रीसाठी एक टोळी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस हवालदार सुभाष मोरे यांना मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव आदींच्या पथकाने साकेत येथील बाळकुमकडे जाणा-या रस्त्यावर गुरुवारी रात्री ८.३० वा.च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील देवजी सावंत याच्यासह तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक तपकिरी रंगाचे मॅनिस क्रॅसिक्युबेट या जातीचे १० किलोचे खवले मांजर हस्तगत केले. त्याची ते ४० लाखांमध्ये विक्री करणार होते, अशी कबुलीही या तिघांनी पोलिसांना दिली. त्यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमनानुसार गुन्हा दाखल केला आहे.चौकटदरम्यान, घुबडविक्रीसाठी चक्क ‘ओएलएक्स’ या संकेतस्थळावर जाहिरात देऊन वन्यपक्ष्यांची विक्री करणाºया सय्यद याला ठाणे वनविभागाने बुधवारी अटक केली. त्याची तो ५० हजारांमध्ये विक्री करण्याच्या प्रयत्नात असतानाच वनविभागाने ही कारवाई केली. प्राण्यांसाठी काम करणा-या एका सामाजिक संघटनेने ही जाहिरात पाहून वनविभागाकडे तक्र ार केली होती. याची वनविभागाने गंभीर दखल घेतली. उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर आणि सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनोज परदेशी, संजय पवार, संदीप मोरे आदींनी सापळा रचून सय्यदला ‘बर्न ओउल’ प्रजातीच्या घुबड या पक्ष्यासह नवी मुंबईतील घणसोलीतून ताब्यात घेतले. ओएलएक्सवर अशा प्रकारची जाहिरात आल्यानंतर त्याची पडताळणी न करता वन्यप्राण्यांच्या विक्रीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिल्याप्रकरणी ‘ओएलएक्स’ या संकेतस्थळाच्या चालकांनाही ठाणे वनविभागाने नोटीस बजावल्याचे देसाई यांनी सांगितले.
ठाण्यात दुर्मीळ खवल्या मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:51 PM
ठाण्यातील साकेत परिसरात महालक्ष्मी मंदिरासमोर दुर्मीळ संरक्षित वन्यजीव खवले मांजराची ४० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. तर ओएलएक्सवर जाहिरात देऊन घुबडाची विक्री करणा-या शम्मी सय्यद यालाही ठाण्याच्या वनविभागाने अटक केली.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एक चीर कारवाई४० लाखांमध्ये करणार होते विक्रीघुबडाची विक्री करणाऱ्याला वनविभागाने पकडले