ठाणे: मोटारसायकलवरुन येत रिक्षातील प्रवासी किंवा पादचाºयांच्या हातातील मोबाईल जबरीने चोरुन पळणाºया पवन गौंड याच्यासह चौघांना राबोडी पोलिसांनी अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी मंगळवारी दिली. त्यांच्याकडून २० मोबाईल आणि तीन मोटारसायकली असा तीन लाख ६७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुंबई ठाणे पूर्व द्रूतगती मार्गावरील हरिदास नगर येथील सेवा रस्त्यावरील रिक्षा स्टॅन्ड येथे १५ जानेवारी २०२३ रोजी सुनिलकुमार गौंड (३५, रा. माजीवडा, ठाणे) हे त्यांच्या घरी पायी जात होते. त्याचवेळी एका मोटारसायकलवरुन आलेल्या तिघांपैेकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने खेचून मुंबईच्या दिशेने पलायन केले. काही अंतरावर मोटारसायकलवर पाठीमागे बसलेला पवन गौंड (२२, रा. भिवंडी ) हा खाली पडला. तर त्याच्या सोबत असलेले इतर दोघे मात्र मोटारसायकलवरुन पसार झाले. पवनला नागरीकांच्या मदतीने राबोडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याचवेळी त्याच्यासह तिघांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्हयाच्या तपासाच्या दरम्यान विकास राजभर (२२, रा. साठेनगर,भिवंडी, ठाणे ) ,संजय राजभर (२०, रा. कारवली, भिवंडी) आणि किशमोहन गौड (२२, गणेशनगर, कामतघर, भिवंडी) या तिघांनाही अटक केली.
या चौघांनी अशाच प्रकारे ठाणे शहरातील अनेक नागरिकांच्या मोबाईलची जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन लाख ३२ हजार १३९ रुपयांचे २० मोबाईल तसेच जबरी चोरीसाठी वापरलेल्या एक लाख ३५ हजारांच्या तीन मोटारसायकली असा तीन लाख ६७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांच्याकडून नागरीकांच्या हातातून मोबाईल फोन जबरीने खेचून नेल्याचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. उपायुक्त गणेश गावडे, सहायक आयुक्त सोनाली ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली राबोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक राजेंद्र गुजर, उपनिरीक्षक दीपक पाटील, सोनाली अहिरे, हवालदार दयानंद नाईक, राजाराम पाटील आणि गिरीष पाटील आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.