उल्हासनगर: हिललाईन पोलीस ठाण्यातील गोळीबार प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे क्राईम ब्रँचच्या पथकाने सकाळी ११ वाजल्यापासून पोलीस ठाण्यात तळ ठोकून तपास सुरू केला आहे. या वृत्ताला पोलीस निरीक्षक पोपट करडकर यांनी दुजोरा दिला असून याबाबत अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला आहे. उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिन मध्ये २ जानेवारीला रात्री ११ वाजता आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे, संदीप सरवनकर यांना पोलिसांनी अटक करून त्यांना १४ फेब्रुवारी पर्यंत उल्हासनगर न्यायालयाने पोलीस कस्टडी सुनावली आहे. तसेच हिललाईन पोलीस ठाणे ऐवजी तपास ठाणे क्राईम ब्रँचकडे वर्ग केला आहे. गोळीबारातील आरोपी असलेले आमदार पुत्र वैभव गायकवाड यांच्यासह तीन जण फरार झाले. गोळीबारच्या दिवसी नेमके काय घडले? याचा तपास क्राईम ब्रँच करीत आहे.
हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिन मध्ये अंदाधुंद गोळीबार तसेच केबिन बाहेर आमदार गणपत गायकवाड व शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्या समर्थकात फ्रीस्टाईल हाणामारी, शिवीगाळ, धक्काबुकीं झाली. अश्या कार्यकर्त्यांवर अद्याप गुन्हे दाखल झाले नसून त्यांची सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे ओळख पाठविण्यात येत आहे. पोलीस ठाण्याच्या प्रांगणात व पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होणार असल्याचे संकेत यापूर्वीच पोलिसांनी दिले आहे. त्यादृष्टीने क्राईम ब्रँच टीम सकाळ पासून हिललाईन पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या एका पथकाने द्वारली गाव येथील वादग्रस्त ठरलेल्या जमिनीची पाहणी केल्याचे, पोलीस सुत्रानुसार समजले आहे.