डोंबिवली: अमृतमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आणि डोंबिवलीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नावाजलेल्या टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात यावर्षी काश्मिरच्या दल सरोवरातील हाऊस बोटीत विराजमान बाप्पाचा देखावा साकारला जात आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक आणि माजी टिळकनगरवासिय संजय शशिकांत धबडे यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी यावर्षीची रौप्यमहोत्सवी सजावट आहे.
धबडे यांच्याशी बोलताना पुढच्या अमृतमहोत्सवी वर्षात मंडळातर्फे डोंबिवलीच्या हम संस्थेला काश्मीरमधील दोन शाळांमध्ये सायन्स लॅब उभारण्यासाठी निधी संकलन करुन देण्याचा मंडळाचा मानस असल्याचे मंडळाने सांगितले, त्यामुळे आपण काश्मिरशी निगडीत सजावट संकल्पना घेऊया असे ठरले.त्यामुळेच संजय धबडे यांच्या संकल्पनेतून त्यांचा सहकलाकारांसह काश्मिरच्या दल सरोवरातील हाऊसबोटीत विराजमान गणेशाची सजावट संकल्पना घेऊन एक आकर्षक सजावट साकारत आहेत.
काश्मिरी कोरीवकाम केलेली हाऊस बोट तसेच दोन शिकारे आणि सभोवताली केलेला दल सरोवराचा आभास आणि मंद काश्मिरी संगीत यामुळे गणेश भक्तांना काश्मिरच्या दल सरोवरात आल्याचा भास होईल असे संजय धबडे म्हणाले. तसेच तेथील दोन्ही शिकाऱ्यांमध्ये बसून फोटो काढण्याचा मोह आवरणार नाही असेही धबडे म्हणाले. पुढे ते म्हणाले माझे बालपण आणि उमेदीचा काळ ज्या टिळकनगरात गेला त्या नगरातील सजावट सलग २५ वर्ष करायला मिळाल्याचा आनंदही खूप होत आहे.
डोंबिवलीकर खूप रसिक आहेत आणि दरवर्षी माझी सजावट संकल्पना बघून माझे मित्र, नगरवासिय आणि डोंबिवलीकर मला फोन करून सजावटीबद्दल अभिप्राय देतात त्यामुळे मला मी केलेल्या कामाचा आनंद मिळतो आणि समाधानही वाटते. पुढील अनेक वर्षे बाप्पाची इच्छा असेल तर टिळक नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सजावट करण्याची माझी इच्छा आहे असेही संजय धबडे म्हणाले. तसेच पुढच्या अमृतमहोत्सवी वर्षात मंडळाच्या सजावटीत एक भव्यदिव्य कलाकृती साकारण्याचा मानसही धबडे यांनी बोलून दाखवला.