कल्याण : आपल्या लाडक्या बाप्पाचा १२ दिवस पाहुणचार केल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीला कल्याण-डोंबिवलीतील भाविकांनी जड अंत:करणाने बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. विसर्जनासाठी बहुतांश भाविकांनी केडीएमसीने उभारलेल्या पर्यावरणाभिमुख कृत्रिम तलावाला पसंती दिली. महापालिका हद्दीत १६९ सार्वजनिक गणेश मंडळांचे, तर १० हजार १५० घरगुती गणपतींचे विविध ठिकाणचे गणेशघाट, तलाव, विहिरी आणि कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन झाले. दरम्यान, दुसºया दिवशी बुधवारी दुर्गाडी येथील गणेशघाटाची बदलापूरच्या प्रकाश ज्ञानशक्ती चॅरिटेबल ट्रस्टने स्वच्छता केली.कल्याण-डोंबिवली शहरांत ४४ हजार १०० घरगुती गणपती व २८८ सार्वजनिक मंडळांच्या गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विसर्जनस्थळावर होणारी गर्दी टाळण्यासाठी तसेच पर्यावरण संतुलनासाठी केडीएमसीने १६ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. यातील चार कृत्रिम तलाव कल्याणमध्ये, तर उर्वरित डोंबिवलीत तयार करण्यात आले होते. विशेष म्हणजे दीड, पाच, सात आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशभक्तांनी या कृत्रिम तलावांना विशेष पसंती दिली. या विसर्जनाच्या दिवशी १५ हजार ६०३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली.गणेशभक्तांनी निर्माल्य तलावात न टाकता विसर्जनस्थळी नेमलेल्या स्वयंसेवकांकडे द्यावे, असे आवाहनही करण्यात आले होते. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. निर्माल्याचे संकलन शहरातील विविध सामाजिक संस्था, नानासाहेब धर्माधिकारी संस्था, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यामार्फत करण्यात आले. त्यामुळे ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यास मोठा हातभार लागला. १३ गणेश विसर्जनस्थळांवर सीसीटीव्ही, अग्निशमन जवान, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही तैनात होते. विद्युत विभागाने ५० जनरेटरची व्यवस्था केली होती.अनंत चतुर्दशीला महापौर राजेंद्र देवळेकर, शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी प्रत्येक विसर्जनस्थळावर भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. विसर्जनाच्या दिवशी पर्यावरणरक्षण व संवर्धनास हातभार लावल्याने देवळेकर व आयुक्त पी. वेलरासू यांनी भक्तांचे आभार मानले आहेत.कल्याण-डोंबिवलीतील मानाच्या गणपतींवर विसर्जन मार्गांवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टीही करण्यात आली. विशेष म्हणजे, उल्हासनगरचे गणपतीही अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवसापर्यंत दुर्गाडी गणेशघाटांवर विसर्जनासाठी येतात. परंतु, यंदा उल्हासनगरला विसर्जनाची व्यवस्था झाल्याने त्यांचे गणपती कमी संख्येने कल्याणला आले. त्यामुळे मंगळवारी रात्रीच या गणेशघाटावरील विसर्जन सोहळा संपला.
गणपती गेले गावाला...चैन पडेना आम्हाला...कल्याण-डोंबिवलीत भावपूर्ण निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:21 AM