लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गणेशाची विविध रूपे असलेल्या मूर्ती सार्वजनिक मंडळात, घरगुती गणेशोत्सवात पाहायला मिळतात. ठाण्यातील वैती कुटुंबाच्या घरी चक्क स्त्री वेशातील गणपती पाहायला मिळत आहे. ‘विनायकी’ असे या गणपतीच्या रूपाचे नाव असून, पहिल्यांदाच अशा स्त्री वेशातील मूर्तीची स्थापना केल्याचे वैती कुटुंबाने सांगितले.
शुक्रवारपासून गणेशोत्सवास सुरुवात झाली. राज्य सरकारने आवाहन केल्याप्रमाणे अनेक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवाचा उत्साह गणेशभक्तांमध्ये पाहायला मिळत आहे. ठाण्यात सामाजिक उपक्रम राबवत तर अनेकांनी पर्यावरणाचा समतोल राखत गणेशोत्सव साजरा केला. गणेशोत्सवात गणेशाची विविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. ठाण्यातील राबोडी येथे राहणारे दिलीप वैती यांनी ‘विनायकी’ या मूर्तीची स्थापना केली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान येथे या मूर्ती पाहायला मिळतात, असे वैती म्हणाले. गणेशाची अनेक रूपे आपल्याला माहीतदेखील नाहीत. त्यातील हे स्त्री वेशातील गणेशाचे रूप. हे रूप गणेशभक्तांना माहीत व्हावे म्हणून प्रथमच स्त्री वेशातील गणेशाची स्थापना आम्ही केली, असे त्यांनी सांगितले. वैती कुटुंब गेली १२० वर्षे अखंडपणे गणेशोत्सव साजरा करीत आहे.
वैती यांना गणेशमूर्तींचा संग्रह करण्याचा छंद आहे. त्यांच्या घरी एक हजारांहून अधिक मूर्ती पाहायला मिळतात. महाविद्यालयात असताना १९९१ साली त्यांनी पहिली दगडाची गणेशमूर्ती आपल्या पॉकेट मनीमधून खरेदी केली. गेली ३० वर्षे ते गणेशमूर्ती जमा करण्याचा छंद जोपासत असून, अर्धा इंच ते चार फुटांपर्यंतच्या मूर्ती त्यांच्याकडे पाहायला मिळतात. कांस्य, सोने, चांदी, विविध धातू, लाकूड, दगड, काच अशा अनेक प्रकारच्या मूर्तींचा संग्रह त्यांच्याकडे आहे. या मूर्ती त्यांनी बंदिस्त ठेवल्या नसून दर्शनीभागी मांडल्या आहेत. यंदाचा स्त्री वेशातील बाप्पा आणि वैतींकडील मूर्तींचा संग्रह बघण्यासाठी गणेशभक्त आवर्जून त्यांच्या घरी येत आहेत.
फोटो मेलवर
..........
वाचली.