शहापूर : शहापुरात मंगळवारी पाच दिवसांच्या घरगुती १४७ आणि १४ सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. गंगा देवस्थान, भारंगी नदीवरील गणेश घाट, भातसा नदी, आसनगाव रेल्वे पुलाजवळ, कांबारे पुलाजवळ आदी ठिकाणी हे विसर्जन करण्यात आले. शहापूर पोलीस क्षेत्राच्या हद्दीत ३२ सार्वजनिक तर १२३० घरगुती गणेशमूर्तींची स्थापना शुक्रवारी करण्यात आली. यापैकी दीड दिवसांचे घरगुती ३५५, तीन दिवसांचे घरगुती २१० गणपतींचे विसर्जन झाले होते.
शहापूर, चेरपोली, कळंभे आदी अनेक भागातील इमारतीमधील गणेशभक्तांनी यंदा इको फ्रेंडली गणपती विसर्जन संकल्पनेला प्राधान्य दिले. ग. वि. खाडे विद्यालयात गणेशमूर्तीचे विसर्जन इको फ्रेंडली पद्धतीने कृत्रिम तलाव तयार करून करण्यात आले. गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर हे पाणी झाडांना वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भारंगी नदीजवळील गणेश घाट येथील गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.