अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: कोरोनामुळे अनेक कारणांनी ताणतणाव, कलह वाढले आहेत. नोकरीच्या ठिकाणची असुरक्षितताही त्यास कारणीभूत आहे. त्यामुळे आलेले नैराश्य, नकारात्मक भावना आणि त्यासोबत अव्यक्त होण्याची स्थिती वाढत आहे. परिणामी घराघरात संवाद होत नसून वाद वाढत असल्याचे आढळले आहे.
कामाचा ताण, ते न केल्यास कामावरून काढून टाकणे, घराचे हप्ते, कर्ज, हाती पैसे नसणे यामुळे कुटुंबाचे कसे होणार? जबाबदाऱ्या कशा पूर्ण होणार? याचा मनावर ताण असतो. तो योग्यवेळी योग्य व्यक्तीकडे व्यक्त न झाल्यास समस्या वाढतात. प्रेशरकुकरसारखी मनाची अवस्था होऊन मनावरील ताण जवळच्या व्यक्तीवर काढला जातो. त्यामुळे बहुतांश घरात आपापसात वादविवाद वाढले आहेत. हे वाद घरातली, नात्यामधील दरी वाढवत असून ते टोकाची भूमिका घेऊ शकतात, तसे न होऊ देण्यासाठी व्यक्त व्हा, मोकळे व्हा, बोलते व्हा असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ देत आहेत.
--------------
मन हलके करणे हाच उपाय :
व्यायाम करणे
योग करणे, प्राणायाम करणे
रागाला शांत ठेवणे
व्यक्त होणे
बोलून मन हलके करा
सकारात्मक विचार करणे
निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी आत्मविश्वास ठेवणे
संयमी, सहनशीलता वाढीस लावणे
सकस आहार घेणे
पुरेशी झोप घेणे
जवळच्या व्यक्तीला मनातलं सांगून टाकणे
चिडचिड न करणे
शरीरस्वास्थ्य टिकवणे
--------------------
कोरोनाकाळात विसंवाद वाढत असल्याने घराघरात अस्वस्थता असल्याच्या तक्रारी येत आहेत. पती-पत्नी यांच्यात सकारात्मक भावना वाढीस लागणे गरजेचे आहे. परस्परांशी विचारविनिमय करणे, संवाद वाढवणे यासाठी कामातून ब्रेक घेऊन थेट बोलणे महत्त्वाचे आहे. कोणताही ताण मनावर न ठेवता व्यक्त व्हायला शिकणे गरजेचे आहे.
- डॉ. विजय चिंचोले, मानसोपचार तज्ज्ञ
..........
वाचली
---------