कल्याण : केडीएमसीने १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना स्वत:च कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाने कोपर परिसरातील ‘बालाजी गार्डन’ सोसायटीचा कचरा उचलणे बंद केले. त्यामुळे तेथील रहिवाशांनी महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात धाव घेतली. या वेळी सोसायटीला चार दिवसांचा वेळ प्रशासनाने दिला आहे.
‘बालाजी गार्डन’मध्ये नऊ इमारती असून त्यात जवळपास ५२२ सदनिका आहेत. या सोसायट्या वर्षाला ५५ लाख रुपये मालमत्ताकर महापालिकेस भरतात. सोसायटीतील रहिवासी ओला व सुका कचरा महापालिकेच्या घंटागाड्यांमध्ये देतात. मात्र, महापालिकेने दोन दिवसांपासून कोणतीही पूर्व सूचना न देता कचरा उचलणे बंद केले आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत अचानक कचरा उचलणे बंद केल्यास अनारोग्याची परिस्थिती उद्भवू शकते. सोसायटीत कोणीही आजारी पडल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल, असा इशारा रहिवाशांनी या वेळी प्रशासनास दिला. महापालिकेकडे न चुकता कर भरूनही महापालिकेकडून कचरा उचलला जात नाही, याकडेही लक्ष वेधले.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे म्हणाले, १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांनी त्यांच्या कचऱ्याची स्वत:च विल्हेवाट लावायची आहे. त्यामुळे कचरा उचलणे बंद केले आहे. आता सोसायटीतील रहिवाशांनी चर्चा केली आहे. सासोयटीने चार दिवसांची मुदत मागून घेतली आहे.
मनसे आमदारांनी वेधले लक्ष
सोसायटीच्या रहिवाशांसह मनसेचे आमदार राजू पाटील यांनी कोकरे यांची भेट घेतली. नागरिक मालमत्ताकर भरत असल्याने त्यांना सर्व प्रकराच्या सोयीसुविधा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे अचानक कचरा उचलणे बंद करणे अयोग्य आहे. कचरा उचलला जावा. नागरिकांना गनपॉइंटवर ठेवून काम करता येणार नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
----------------------