कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्रांपैकी चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे काम खासगी कंत्राटदार कंपनीला दिले होते. या कंपनीकडून कचरा उचलण्यात कसूर केली जात असल्यामुळे या कंपनीला महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दंड ठोठावला. त्यानंतरही कंत्राटदाराच्या कामात सुधारणा होत नसल्याने प्रशासनाने त्याचे एका प्रभाग क्षेत्रातील कचरा उचलण्याचे कंत्राट रद्द केले आहे. कंत्राटदाराच्या १० कचरागाड्या नादुरुस्त असल्याने साेमवारी काही ठिकाणचा कचरा उचलला गेल्या नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत. यातून कंत्राटदार हा महापालिकेस जुमानत नसल्याचे उघड झाले आहे.
महापालिका हद्दीतील कचरा उचलण्याचे काम आर ॲण्ड डी या खासगी कंपनीला दिले होते. चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे हे कंत्राट २०१९ मध्ये दिले हाेते. महिन्याला कचरा उचलण्याच्या बिलापोटी महापालिका प्रशासन कंत्राटदाराला दीड कोटींचे बिल अदा करते. कंत्राटदाराकडून कचरा उचलण्यात कसूर केल्यास महापालिकेने कंत्राटदारास वारंवार दंड ठोठावला आहे. कंत्राट दिल्यापासून आतापर्यंत संबंधित कंत्राटदार कंपनीला महापालिकेने दोन कोटींचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलातून वळती करून घेतली जाते. कंत्राटदाराकडे कचरा उचलण्यासाठी ५० कचरा गाड्या आहेत. त्यापैकी १० कचरा गाड्या या नादुरुस्त स्थितीत खडकपाडा पोलीस ठाण्यासमोर पालिकेच्या पार्किंगच्या जागेत उभ्या करून ठेवल्या आहेत. गाड्या नादुरुस्त असल्याने अनेक ठिकाणचा कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. महापालिकेने शून्य कचरा मोहिमेंतर्गत कचराकुंड्या काढून घेतल्या असल्याने कचरा रस्त्याच्या कडेला पडून आहे. कचरागाड्यांना जीपीएस सिस्टीम लावण्याचा मानस यापूर्वी घनकचरा व्यवस्थापनाने जाहीर केला हाेता.
‘लवकरच जीपीएस सिस्टीम सुरू करणार’
लवकरच ही सिस्टीम महापालिकेच्या कचरागाड्यांना लावण्यात येणार आहे. तसेच कंत्राटदारालाही जीपीएस सिस्टीम लावण्याची सक्ती केली जाणार आहे. कंत्राटदाराकडून कचरा उचलण्यात कसूर केली जात असल्याने चार प्रभागांपैकी एका प्रभागातील कचरा उचलण्याचे काम काढून घेण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. तसेच कचरा उचलला गेला नसल्यास कारवाई अधिक सक्तीने केली जाईल, अशी नोटीस कंत्राटदाराला बजावण्यात आली असल्याचे उपायुक्त कोकरे यांनी सांगितले.
फोटो-कल्याण-कचरागाड्या
--------------------------------