नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहर महानगरपालिकेत कचरा कोंडीची समस्या नेहमीचीच बाब झाली असून बुधवारी चावींद्रा येथील डम्पिंग ग्राउंडवर कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने सकाळपासून डंपिंग ग्राउंडवर कचरा टाकण्यासाठी गेलेल्या वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.या कचरावाहू वाहनांच्या रांगा लागल्याने परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती.या दुर्गंधीने स्थानिक नागरिक हैराण झाले होते.सकाळपासून डंपिंगग्राऊंडवर झालेल्या कचरा कोंडीच्या दुर्गंधीमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सायंकाळी अखेर रांगेत उभे असलेल्या कचरा वाहू वाहनांना अक्षरशः पिटाळून लावले.त्यामुळे भयभीत झालेल्या कचरा वाहू वाहन चालकांनी आपली कचरा भरलेली वाहने थेट मनपा मुख्यालयासमोर उभी केली.
कचरा वाहू वाहने मनपा मुख्यालयासमोर उभी राहिल्याने मुख्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता.त्यातच या कचरा भरलेल्या वाहनांमुळे मनपा मुख्यालय परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती.त्यामुळे प्रवाशांसह मनपा मुख्यालयात कामासाठी येणाऱ्या अभ्यंगतांना नाक मुठीत धरूनच मुख्यालय प्रवेश करण्याची नामुष्की ओढवली होती.
भिवंडी महापालिका हद्दीत कचराकोंडीची समस्या नित्याची बाब झाली असल्याने शहरात स्वच्छ भारत अभियानाचादेखील बोजवारा उडाला असल्याचे चित्र आज समोर आले आहे. डंपिंग ग्राऊंडवर काही समस्या निर्माण झाल्याने कचरा वाहू वाहने मनपा मुख्यालयासमोर आली असून चावींद्रा डंपिंग ग्राऊंड परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन लवकरच हि समस्या सुटेल अशी प्रतिक्रिया मनपा उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली आहे.