लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे महापालिकेचा घनकचरा विभाग दोन वर्षांनंतर आता पुन्हा प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या सोसायट्यांना नोटिसा बजावण्याची सुरुवात करणार आहे. त्यानुसार पुढील आठवड्यापासून शहरातील दोन हजार सोसायट्यांसह चार मॉलला या नोटिसा बजावल्या जाणार आहेत. त्यानुसार, त्यांनीच त्यांच्याकडे निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करायची असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिकेने तीन वर्षांपूर्वी ४२५ गृहसंकुले आणि आस्थापनांना नोटिसा बजावल्या होत्या.
समस्या संपविण्यासाठी उचलले पाऊलमहापालिकेने असा दावा केला असला तरीदेखील त्यातील किती सोसायट्या आता ही प्रक्रिया राबवितात, याबाबत शंका आहे. तसेच नव्याने गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे आता महापालिकेने पुन्हा या गृहसंकुलांकडे आपली मोहीम वळविली आहे. त्यात आता महापालिकेचे हक्काचे डम्पिंग अर्थात कचऱ्यावर प्रक्रिया करणारे केंद्रही सुरू होत आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या संपविण्यासाठी महापालिकेने ही पावले उचलली आहेत.
चार मॉलच्या ठिकाणीही नोटीससध्या हिरानंदानी भागात पाच मेट्रिक टनचा प्रकल्प राबविला जात आहे. तसेच शहरातील इतर काही सोसायट्याही अशा पद्धतीने प्रकल्प राबवीत आहेत. त्यातही पालिकेने केलेल्या एका सर्वेक्षणात १४० अशा सोसायट्या आहेत, त्याठिकाणी १०० किलोपेक्षा अधिकचा कचरा निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यापासून सुरुवात करण्याचा पालिकेचा मानस आहे. शिवाय शहरात असलेल्या चार मॉलच्या ठिकाणीही नोटीस बजावली जाणार असून, त्यांनादेखील त्यांच्या क्षेत्रात कचऱ्याचा प्रकल्प राबविण्यास सांगितले जाणार आहे.