उल्हासनगर : शहरातील कचरा उचलण्याचा ठेका दुप्पट किंमतीला, मग कामगारांना किमान वेतन का नाही?. असा प्रश्न करीत करीत कंत्राटी कामगारांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. महापालिका प्रशासनाने आंदोलनाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेतल्याची माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा ठेका महापालिकेने कोणार्क कंपनीला दिला. दरदिवशी ४ लाख ४३ हजाराचा ठेका दुप्पट ८ लाखा पेक्षा जास्त किंमतीला गेल्या वर्षी देण्याला महासभेने मंजुरी दिली. तसेच महापालिकेने भारत स्वछता अभियाना खाली नवीन वाहने देण्यात आली आहे. असे असतांना कंत्राटी कामगारांना कोणतीही सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली नाही. तसेच शासन नियमानुसार किमान वेतन देण्याची मागणी।करीत कामगारांनी महापालिकेसमोर आंदोलन केले. कामगारांच्या विविध मागणीसाठी कामगार आयुक्त कार्यालयासह संबंधितांना निवेदन दिले. महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी याबाबत दखल घेत असल्याचे सांगितल्याने, कामगारांचे आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याचे कामगार नेते संदीप गायकवाड यांनी सांगितले.
महापालिकेतील कचरा उचलण्याचा ठेका दुपट्ट किंमतीला देऊनही शहरात कचऱ्याचे ढीग जैसे थे आहे. तसेच कचरा उचळणार्या कंत्राटी कामगारात असंतोष निर्माण झाला असून महापालिका आयुक्तांनी अश्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वेळेत वेतन न देणे, कमी वेतन देणे, अटी व शर्तीनुसार सुविधा न पुरविणे आदी आरोप कामगारांनी आंदोलन दरम्यान केले आहेत.