कल्याण : आधारवाडी डम्पिंगला शनिवारी लागलेल्या आगीमुळे कचरा वर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वर्गीकरण केल्यास कचरा डम्पिंगवर जाणार नाही. त्यामुळे आग लागणार नाही, याकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष वेधले आहे.आधारवाडी डम्पिंगवरील कचऱ्यात उन्हाच्या तडाख्यामुळे मिथेन वायू तयार होऊन तेथे आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. लॉकडाउन ही कचरा वर्गीकरणाची संधी समजून कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने सक्ती केली आहे. वेंगुर्ला नगर परिषदेत कचरा प्रक्रियेचा पॅटर्न यशस्वी करून डम्पिंग मुक्त करणारे अधिकारी रामदास कोकरे हे महापालिकच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आहेत. महापालिकेने बायोगॅस प्रकल्प आणि प्लास्टिकपासून इंधन तयार करण्याचे प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पांना पुरेसा कचरा मिळत नाही. कचरा वर्गीकरण झाल्यास हे प्रकल्प योग्य प्रकारे चालतील. विरोध होत असल्यामुळे प्रकल्प उभे न राहिल्याने आधारवाडी डम्पिंग बंद होत नाही. कचरा वर्गीकरण करण्यास सांगितले तर लॉकडाउनमध्ये डस्टबीन नाही, कामगार येत नाहीत, वेळ नाही अशी कारणे नागरिक देतात. मात्र, हेच लोक कचरा न उचलला गेल्यास प्रशासनाच्या नावाने खडे फोडतात. कोरोनामुक्तीप्रमाणेच शहर कचरामुक्त व डम्पिंगमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊ न महापालिकेस सहकार्य करावे. कचरा वर्गीकरण झाल्यास डम्पिंगवर कचराच न गेल्याने डम्पिंगला आग लागणारच नाही, याकडे उपअभियंता मिलिंद गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.कचरा वर्गीकरण सक्तीची ही वेळ नाहीमहापालिका हद्दीत कचरा वर्गीकरणाची सक्ती केल्याने कचराकुंड्या हटविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. कचरा वर्गीकरण करण्यासाठी लॉकडाउनच्या काळात सक्ती करण्याची ही वेळ नाही, याकडे शिवसेना नगरसेवक सचिन बासरे यांनी लक्ष वेधले आहे.महापालिका नागरिकांकडून ७२ टक्के कर गोळा करते. मात्र, नागरिकांना कचरा वर्गीकरणासाठी डस्टबीन पुरवत नाही. आहे त्या कुंड्या काढून घेते. कोरोनाच्या काळात ही सक्ती करणे योग्य नाही. तसेच वेंगुर्ला डम्पिंगमुक्त झाले. मात्र, त्याठिकाणची लोकसंख्या व कचºयाचे प्रमाण व येथील लोकसंख्या आणि कचºयाचे प्रमाण यात फरक आहे.
कचरा वर्गीकरणामुळे आगीची समस्या मिटेल! घनकचरा विभागाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 2:39 AM