ठाणे : भिवंडीच्या खाडी किनारी कचऱ्याचे डम्पिंग होत असून त्यासाठी कोणाचीही परवानगी नसताना केवळ एका खाजगी मालकाच्या फायदासाठी त्याठिकाणी कचऱ्याच्या गाड्या जात होत्या, याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही बाब समोर आणली होती. तसेच ठाणे महापालिकेला सुद्धा यायाबत सांगितले होते. मात्र त्यानंतरही गाड्या जात असल्याने सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यकरतायनी त्या गाड्यांची हवा काढली तसेच काचाही फोडल्या असल्याची घटना समोर आली आहे.
ठाण्यातील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट भिवंडीच्या खाडीकिनारी करीत असल्यामुळे पूर्ण शहरभर दुर्गंधी पसरली आहे. ही अनधिकृत भरणी खासगी मालकाच्या प्लॉटवर केली जाते आहे. अशी भरणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. या कचऱ्याच्या भरणीमुळे हवा प्रदूषित होत आहे. खाडीचे पाणी प्रदूषित होत आहे. हिवाळ्यात परदेशातून येणारे स्थलांतरी पक्षी येईनासे झाले आहे, असे आव्हाड यांनी सोशल मीडियावर सांगितले होते. तसेच त्याठिकाणचे व्हिडिओ देखील दाखवले होते.
एवढं होऊनसुद्धा ठाणे महानगरपालिका प्रशासन ऐकायला तयार नाही. म्हणून सोमवारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कचरा वाहून नेणाऱ्या वाहनाची हवा काढली. आम्ही आंदोलन करीतच राहू; पण, ठाणेकर जनतेनेसुद्धा रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवावी. ४० वर्ष होऊनही जर ठाणे महानगर पालिकेला स्वतंत्र डंम्पिग ग्राऊंड बनवता येत नसेल तर ठाणेकरांनी या लोकांना निवडून देणे म्हणजे आत्मघातच नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.