नामदेव पाषाणकर, घोडबंदरस्वस्त दरात मिळणाऱ्या अन्नधान्यातून गरिबांच्या पोटाची सोय झाली खरी, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून मिळणारा गहू कमी प्रतीचा आणि कचरामिश्रित दिला जात असल्याने महिलावर्गात संताप आहे. गव्हात खडे, माती व कचऱ्याचे प्रमाण जवळपास ३० टक्क्यांहून अधिक असल्याने तो निवडता निवडता महिलांचे कंबरडे मोडत आहे. दोन रु पयांत काय मिळते, म्हणून नाइलाजाने तो खाण्यावाचून पर्याय नसल्याने वापरला जात आहे.अन्न सुरक्षा कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून गहू, तांदूळ स्वीकारतांना शासनाच्या निर्देशानुसार धान्याचा दर्जा तपासण्यात येतो. तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच त्याची उचल करण्यात येते. संयुक्त तपासणीच्या वेळी भारतीय महामंडळाचे व शासनाचे प्रतिनिधी उपस्थित असतात. तरीही, कचरा मिसळलेला गहू रेशन दुकानांपर्यंत कसा पोहोचवला जातो, याचे उत्तर अन्न व नागरीपुरवठा विभागाकडून मिळत नाही. हे अधिकारी धान्याचा दर्जा योग्य असल्याचा अहवाल शासनाला सादर करत असतात. ज्यांनी तो सादर केला नाही, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. असे सांगितले जात असले तरी अशी कारवाई झाल्याचे अद्यापपर्यंत समोर आले नसल्याने ही भ्रष्टाचाराची साखळी तर कार्यरत नाही ना, अशी शंका घेण्यास वाव आहे. कचरा असलेला हा गहू खरेदी करताना रेशनकार्डधारक आणि दुकानदारांत खटके उडत आहेत.कचरा असलेला गहू कार्डधारकांना पुरवला जात नसून कुठल्या दुकानांत असा गहू आहे, त्या दुकानांची नावे द्या. आम्ही तपासणी करून कारवाई करू, असे उपनियंत्रक अशोक मुंडे यांनी सांगितले.
पाच महिन्यांपासून मिळतोय रेशनवर कचरायुक्त गहू
By admin | Published: November 30, 2015 2:12 AM