मीरारोड - शनिवारी रात्री पडलेल्या पावसामुळे मीरा रोडच्या एका वसाहतीच्या बगीच्यात खेळणाऱ्या चार लहान मुलांना विजेचा धक्का बसल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये एका 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, एकीला रुग्णालयात दाखल केले आहे. मीरा रोडच्या बेव्हर्ली पार्क भागात सॅण्ड स्टोन नावाचे मोठे गृहसंकुल आहे.323 सदनिका असलेली ही मोठी वसाहत असून, मुलांना खेळण्यासाठी बगीचा आहे. शनिवारी रात्री अचानक आलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली होती. तर पहिल्या पावसाचा आनंद घेण्यासाठी लहान मुलं बगीच्यात खेळत होती. रात्री 8 च्या सुमारास बगीच्याच्या लोखंडी तारेचा स्पर्श झाल्याने चौघा लहान मुलांना विजेचा धक्का लागला. यात श्रुती राम यादव ( 11 ) हिचा विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाला. तर जखमी झालेल्या श्रद्धा सुरेंद्र कनोजिया ( 12 ) या मुलीला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन मुलांना मात्र किरकोळ दुखापत झाल्यानं ते बालंबाल बचावले.श्रुती ही 5 व्या इयत्तेत शिकत होती. तर श्रद्धा हिला आज घरी आणण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मीरा रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलाय. पावसामुळे उघड्यावर असलेल्या वीज वाहक तारेचा स्पर्श लोखंडी जाळीला होऊन त्यात विद्युत प्रवाह पसरल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे यांनी व्यक्त केली आहे . रिलायन्स एनर्जीचे अधिका-यांना पाचारण केले होते. त्यांनी देखील पाहणी केली आहे. या प्रकरणी पालकांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करू, असे ते म्हणाले.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, नागरिकांनी आपल्या वसाहती व घर परिसरातील वीजवाहक तारा, विजेचे दिवे व उपकरणे आदींची तपासणी करून घ्यावी. वीज प्रवाह पसरून विजेचा धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन लब्दे यांनी केले.
बागेत खेळताना विजेचा धक्का लागून मुलीचा मृत्यू, तर एक चिमुकली जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2018 8:55 PM