ठाणे : गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन १७ झोपड्या ठाण्यातील भीमनगरात सोमवारी जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी, भीषण आगीच्या ज्वाळांनी परिसरात हाहाकार उडाला होता.वर्तकनगर परिसरातील भीमनगर झोपडपट्टीत सोमवारी दुपारी सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामुळे परिसरातील रहिवाशांची धावपळ उडाली. सिलिंडरच्या स्फोटाने झोपड्यांना लगेच आग लागली. आग झपाट्याने पसरली. अल्पावधीत जवळपासच्या १७ झोपड्यांना ज्वाळांनी कवेत घेतले. स्फोटाच्या आवाजाने नागरिक लगेच घराबाहेर पडले.भीमनगर हा झोपडपट्टी परिसर असून येथील घरे पत्र्याची आहेत. स्फोटाच्या हादºयाने झोपड्यांचे पत्रे फाटले. या आगीत येथील रहिवाशांच्या घरातील साहित्य मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्नीशमन दल आणि व्यवस्थापनाच्या अधिकाºयांनी सांगितले. अग्निशमन दलाने ४ बंब एक रुग्णवाहिका आणि एक कार्डियाक रुग्णवाहिका सोबत घेऊन तातडीने घटनास्थळ गाठले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाने केला. तत्पूर्वी खबरदारी म्हणून या भागातील नागरिकांना घराबाहेर काढण्यात आले. आग वाढू नये, यासाठी सर्वांच्या घरांमधील गॅस सिलिंडर्सही बाहेर काढण्यात आले.महापौर मिनाक्षी शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रभावित रहिवाशांचे तुर्तास पालिकेच्या शाळेत पुनर्वसन करण्यात येईल. घरे उपलब्ध झाल्यास त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले. ही घटना अतिशय दुर्दैवी असून, याबाबत पालिका प्रशासनाला जाब विचारण्यात येईल. अनधिकृत झोपड्या झाल्या, त्याचवेळी कारवाई करणे उचित होेते, असे मतही महापौरांनी यावेळी व्यक्त केले.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पोहोचतील एवढीही पुरेसी जागा नव्हती. अतिशय अडचणीच्या जागेमध्ये अग्निशमन दलाला मदत कार्य पूर्ण करावे लागले. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न या पार्श्वभूमिवर उपस्थित होत आहे. या दुर्घटेत एक रहिवासी किरकोळ जखमी झाला. सिलिंडरच्या स्फोटानंतर तातडीने आजुबाजुच्या घरांमधील गॅस सिलिंडर्स बाहेर काढण्यात आले. त्यापैकी २ सिलिंडरमध्ये गळती असल्याचे निदर्शनास आले. हे दोन्ही सिलिंडर्स अग्निशमन दलाच्या ताब्यात दिले असल्याची माहिती पालिका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संतोष कदम यांनी दिली.
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने ठाण्यात १७ झोपड्यांना भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:54 PM
ठाण्यातील भीमनगरातील झोपडपट्टीत सोमवारी दुपारी भीषण आगीने खळबळ उडाली. सिलिंडरच्या स्फोटाने या झोपडपट्टीतील घरांचे मोठे नुकसान झाले.
ठळक मुद्देवर्तकनगर येथील भीमनगरातील घटनाएक रहिवासी किरकोळ जखमीमहापौरांची भेटप्रभावित रहिवाशांचे तात्पुरते पुनर्वसन