अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: दिव्यात गॅस सिलिंडर गळती लागलेल्या आगीत दोन जण जखमी झाल्याची घटना ताजी असताना, वागळे इस्टेट, किसननगर येथे गॅस सिलिंडर गळती होऊन आग लागली आहे. त्या आगीत विवेक गुप्ता (२५) आणि सुनीता गुप्ता (४५) ते दोघेही १० टक्के भाजले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी पावणे सहा ते सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली.
वागळे इस्टेट,किसन नगर क्रमांक ०३, ओम शांती अपार्टमेंट या तळ अधिक ०३ मजली पहिल्या मजल्यावरील रूम क्रमांक १०४ हे ओमप्रकाश गुप्ता यांच्या मालकीचे आहे. शनिवारी सायंकाळी या घरात गॅस सिलिंडर गळती होऊन लागली. यामध्ये दोघे जण जखमी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेत, ती आग काही मिनिटात नियंत्रणात आणण्यात ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र या आगीमध्ये घरातील संपूर्ण इलेक्ट्रिक वायरिंग, एसी युनिट, गॅस शेगडी, प्लास्टिक व इतर भांडी पूर्णपणे जळाली आहेत. तसेच उपचारार्थ दाखल असलेल्या विवेक याच्या दोन्ही पायाला आणि हाताला व पाठीला भाजल्यामुळे दुखापत झाली आहे. तर, सुनीता यांच्या दोन्ही हाताला, पायाला, चेहऱ्यावरती व छातीवरती भाजल्यामुळे दुखापत झाली आहे.
याशिवाय त्या रूम मधील ०२-भारत गॅस सिलिंडर व ०३-HP गॅस सिलिंडर अग्निशमन दलाच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.