ठाणे : ठाण्यातील कळवा येथे झालेल्या गॅसच्या भडक्यात सहा झोपड्या जळून खाक झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ती तातडीने आटोक्यात आणली. सुरुवातीला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यानंतर, लोखंडी पत्रे तापून वाढलेल्या उष्णतेने एका घरातील गॅसगळती होऊन त्याचा भडका झाल्याचे सूत्रांनी सांगितले.कळवा, मनीषानगर, गेट नंबर-१ येथे असलेल्या सायबानगर येथे झोपडपट्टी आहे. त्याच झोपडपट्टीत लागलेल्या आगीची झळ दिनेश सिंग, मोहन गुप्ता, संभाकुमार मंडल, विनोद पाल, रणजित गुप्ता, राम नारायण नाजक या सहा जणांच्या घरांना बसली आहे. कळव्यात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना समजताच ठामपा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यावेळी एक वॉटर टँकर, दोन फायर इंजीन आणि तीन रेस्क्यू व्हॅन दाखल झाले. मात्र, गॅस सिलिंडर स्फोट झाला नसून गॅस सिलिंडरचा भडका झाल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.पंधरा दिवसांपूर्वीच वागळे इस्टेट येथील इंदिरानगर येथे गॅस सिलिंडरचा भडका होऊन नऊ जण जखमी झाले होते. त्यामध्ये उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.
कळव्यात गॅसचा भडका; सहा झोपड्या जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 12:36 AM