ठाणे : वडापाव केंद्रावरील गॅस पाईपलाईन लिकेजमुळे भारत गॅस सिलिंडर रेग्युलेटरमध्ये किरकोळ आग लागून एक महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडिअम येथील खारटन रोड परिसरात सुरु असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणच्या साईट येथे घडली. आग नियंत्रणात असून जखमी महिलेला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. त्या २० टक्के भाजल्या असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.
दादोजी कोंडदेव स्टेडियमसमोर, हनुमान मंदिराच्या पुढे, नागसेन नगर, खारटन रोड येथे ते वडापाव केंद्र आहे. ते कैलास साधनकर यांच्या मालकीचे असून ते उपेंद्र परचा यांनी चालवायला घेतले आहे. त्या केंद्रात शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणे राजबिरी उपेंद्र परचा (३५) या काम करत होत्या. त्यावेळी तेथील गॅस पाईपलाईन लिकेजमुळे भारत गॅस सिलिंडर रेग्युलेटरमध्ये किरकोळ आग लागून भडका झाला. यामध्ये राजबिरी यांचे दोन्ही हात आणि पाय २० टक्के भाजल्या असून त्यांना तातडीने कळवा येथील ठाणे महापालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे.या घटनेची माहिती मिळताच ठामपा प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या आगीवर नियंत्रण मिळविले. यावेळी फायर इंजिनला पाचारण केले होते.