अंबरनाथ : अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी मधून रासायनिक कंपनीतून मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडल्याने स्थानिक रहिवाशांना त्रास जाणवत होता. नेमकी या कंपन्यांनी गॅस सोडले होते की गॅस गळती झाली होती हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.
अंबरनाथच्या मोरिवली एमआयडीसी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने असून रात्रीच्या वेळेस या कंपन्यांपैकी अनेक कंपन्या मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर सोडत असतात. मात्र गुरुवारी रात्री दहा वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात उग्र वास असलेला गॅस सोडण्यात आल्याने नागरिकांना त्याचा त्रास जाणवू लागला होता. मोरीवली गावातील रहिवाशांसह अंबरनाथ पूर्व भागातील बी केबिन रोडवर असलेल्या सर्वच गृह संकुलातील नागरिकांना त्याचा त्रास जाणवला. याची कल्पना येताच स्थानिक रहिवाशांनी अग्निशामक दलाला देखील पाचारण केले. मात्र कोणत्या कंपनीतून गॅस सोडण्यात आले हे स्पष्ट झाले नाही.
ज्या प्रमाणात गॅसचा उग्र वास येत होता आणि संपूर्ण परिसरात धुकांच्या स्वरूपात गॅस पसरला होता त्यावरून कोणत्या कंपनीने गॅस सोडला नसून त्या कंपनीमधून गॅस गळती झाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण अंबरनाथ शहरात केमिकलचा धूर पसरल्यामुळे नागरिक देखील धास्तावले होते. मोरिवली मधील अनेक कंपन्या रेल्वे रुळाला लागूनच असल्यामुळे या केमिकलचा त्रास रेल्वे प्रवाशांना देखील सहन करावा लागला.