ठाणे: कोपरीपूर्व भागातील उड्डाणपुलासाठी खोदकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसवाहिनीचे मोठे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ऐन सकाळच्या वेळीच गॅसची गळती झाल्यामुळे कोपरीतील १०० ते १५० संकुलांतील गृहिणींना याचा नाहक फटका सहन करावा लागला. साधारणत पाच तासांनंतर हा गॅसपुरवठा सुरळीत सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोपरी येथे नव्या उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. या खोदकामासाठी जेसीबीची मदत घेतली जात आहे. दरम्यान, जेसीबीचा महानगर गॅस वाहिनीला धक्का लागून ती फुटली. यामुळे त्या परिसरातील जवळपास १५० कुटुंबीयांना त्याचा फटका बसला. याबाबतची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांसह महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. महानगर गॅसने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन प्रथम ही गळती थांबविली. त्यानंतर, पाच तास चाललेले दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गॅस वाहिनीतून गृहसंकुलांमध्ये सुरळीत पुरवठा झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.