ठाणे : भूमिगत पाण्याची लाइन आणि रस्तादुरुस्तीसाठी जेसीबीने खोदकाम सुरू असताना महानगर गॅसची पाइपलाइन फुटल्याची घटना शुक्रवारी सकाळी पाचपाखाडी परिसरातील सर्व्हिस रोडवर घडली. या पाइपलाइनमधून २० मिनिटे मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाल्याने तीवरील दोन हजार ग्राहकांचा तीन तासांहून अधिक वेळ गॅसपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीनंतर तो सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.या घटनेची माहिती समजताच ठामपा आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. गॅसची मोठ्या प्रमाणात गळती होत असतानाही या रस्त्यावरून वाहनांची येजा मात्र सुरू होती. परिणामी मोठी दुर्घटना होण्याचा धोका होता. या घटनेमुळे या परिसरातील दोन हजार गॅस ग्राहकांचा गॅसपुरवठा बंद झाला. संध्याकाळी ५ पर्यंत हे दुरु स्तीचे काम सुरु होते. काम पूर्ण झाल्यानंतर गॅसपुरवठा सुरळीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुरुस्ती सुरु असताना दुर्घटना होऊ नये, याची काळजी घेण्यात आली.तरुणीला सेल्फीचा मोहगॅसलाइन फुटल्यानंतर तेथून वाहने धावत असताना मोबाइल फोनद्वारे छायाचित्रण सुरू होते. त्यातच तेथे आलेल्या एका तरुणीला फुटलेल्या पाइपलाइनसोबत सेल्फीचा मोह आवरला नाही. हा प्रकार पाहून महापालिका अधिकारी तिच्यावर चांगलेच संतापले.
दुर्घटना टळली : गॅसलाइन फुटल्याने हजारो ग्राहकांचा पुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 2:05 AM