लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर आगामी केडीएमसी निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असताना राज्यात महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मनपाची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. पक्ष बळकटीसाठी राष्ट्रवादीचे मेळावे एकीकडे पार पडत असताना दुसरीकडे काँग्रेस आपल्या दारी या अभियानातून काँग्रेसनेदेखील निवडणूकपूर्व तयारीला सुरुवात केली आहे. २०१५ च्या निवडणुकीत झालेला पराभव पाहता मेळावे आणि अभियान दोन्ही पक्षांना आगामी निवडणुकीत कितपत यश मिळवून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२०१५ च्या मनपा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनुक्रमे अवघे चार आणि दोन नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने २००५ मध्ये अडीच वर्षे का होईना सत्तेत असलेल्या काँग्रेससह राष्ट्रवादीलाही कालांतराने उतरती कळा लागली. दरम्यान, आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी दोघांनीही सुरू केली आहे. कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी घेतलेल्या बैठकीत केडीएमसीची निवडणूक स्वबळावर लढविण्यावर एकमत झाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी कल्याण पश्चिमेत अलीकडेच पार पडलेल्या मेळाव्यात स्वबळाचा नारा दिला आहे. जिल्हाध्यक्ष शिंदे आणि निरीक्षक प्रमोद हिंदुराव यांच्या प्रमुख उपस्थितीत चारही विधानसभा क्षेत्रांत मेळावे, बैठकांचे सत्र सुरू असून, त्याला कार्यकर्त्यांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक नेत्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, हा उत्साह आणि जोश निवडणुकीपर्यंत कायम राहतो का, हेदेखील महत्त्वाचे आहे.
----------------------------------------------
...तर पदावरून काढून टाकले जाईल
काँग्रेस आपल्या दारी अभियानाला काँग्रेसकडून प्रारंभ झाला आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हे अभियान सुरू झाले असून, जिल्हाअध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली ३० सप्टेंबपर्यंत ते चालणार आहे. याअंतर्गत काँग्रेसची विचारधारा मानणारे सामाजिक कार्यकर्ते, तसेच काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या घरी भेट देऊन येणाऱ्या मनपा निवडणुकीसंदर्भात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जिल्ह्यात बूथ कमिटीपासून वॉर्ड कमिटीपर्यंत पुनर्रचना करण्याचे काम या अभियानांतर्गत चालणार आहे. जर कोणी बूथ कमिटी तर वॉर्ड कमिटीपर्यंत या अभियानांतर्गत तयारी नाही केली तर त्यांना पदावरून काढून टाकण्यात येईल असा इशारा पोटे यांनी दिला आहे. कला, क्रीडा, साहित्य या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि जे राजकारणाविरहित सामान्यांसाठी काम करीत आहेत, त्यांच्या घरी भेट देऊन पक्षाची विचारधारा पुन्हा रुजविण्याचे काम या अभियानातून केले जाणार आहे.
------------------------------------------------------