लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरात मनुष्यबळ नसल्याने काेविड सेंटर बंद आहेत. ऑक्सिजन नसल्याने बेड रिकामे आहेत. रेमडेसिविरचा तुटवडा आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांच्या हातावर लावण्यासाठी शाई नाही, वॉरचा कारभार राम भरोसे असून पीपीई किट नसल्याने मृतदेह चक्क प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून देण्याचा प्रकार घडला. यावरून मंगळवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाविराेधात आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी नियंत्रण समिती स्थापण्याचा ठराव करण्यात आला.मंगळवारी महासभा सुरू होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे आणि भाजपचे नारायण पवार यांनी लक्षवेधी मांडून ऑक्सिजनसह रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले. विक्रांत चव्हाण यांनी कोविडसाठी निधी देऊनही त्याचे नियोजन होताना दिसत नाही. त्यामुळे तीन वर्षांचे योग्य नियोजन करून निधी उपलब्ध करावा, असे सांगितले. मनोहर डुंबरे यांनी खासगी रुग्णालयातील मृतदेह एक दिवस उलटूनही उचलले जात नसल्याचा आरोप केला. शिवसेनेचे विकास रेपाळे यांनी कोविड सेंटरमध्ये मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली. दिव्यात अद्याप कोविड सेंटर नसल्याची खंत बाबाजी पाटील यांनी व्यक्त केली. वॉर रूमची शिक्षकांवर जबाबदारी द्यावी, अशी मागणी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली. गरीब रुग्णांना ग्लोबलमध्ये दाखल करण्याचा सल्ला देण्याऐवजी खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा अजब सल्ला पालिका देत असल्याचा आरोप अनिता गौरी यांनी केला. डॉक्टर रुग्ण दाखल करून घेण्यासाठी घाबरत असून त्यांची मानसिकता बदलण्यात यावी, अशी मागणी मिलिंद पाटणकर यांनी केली. नजीब मुल्ला यांनी समिती स्थापन करावी, त्यात सर्वपक्षीय नगरसेवक, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, एफडीएचे काही अधिकारी, पोलीस यांचा समावेश करण्याचा ठराव मांडला.रुग्णसंख्या वाढल्याने ताण वाढलादुस:या लाटेतही महापालिकेने योग्य तयारी केलेली आहे. काही त्रुटी असतील परंतु प्रशासनाचे काम सुरू आहे. या लाटेत बेड उपलब्ध न होणे, रुग्णांना औषधे न मिळाल्याने नगरसेवकांचा संताप वाढला आहे, त्यामुळे नगरसेवकांनी खंत व्यक्त केली. याचा शोध घेणे गरजेचे आहे. रेमडेसिविरसह ऑक्सिजनवरून प्रशासनाला दोषी ठरविणे अयोग्य आहे. राेज रुग्ण वाढत असल्याने बेडदेखील उपलब्ध होत नाही, रुग्णांना रोज अधिकचे ऑक्सिजन लागत असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. ते मिळावे यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत, खाजगी रुग्णालयांनाही महापालिकेने ऑक्सिजनपुरवठा केला आहे. वॉररूमच्या समस्या सोडविण्यासाठी स्वत: प्रयत्न केला आहे. छोट्याछट्या् चुका का? होतात, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. - नरेश म्हस्के, महापौर - ठामपा
आराेग्य साहित्य तुटवड्यावरून महासभा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:10 AM