कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेला शुक्रवारी ११ वाजता सुरुवात होणार होती. मात्र, १२ वाजले तरी केवळ २८ सदस्य सभेला आले होते. सदस्यांना महासभेचे आणि वेळेचे गांभीर्य नसल्याने महापौर विनीता राणे यांनी ही महासभा रद्द केली. यापुढील सर्व सभा वेळेवर सुरू केल्या जातील, अशी तंबी दिली आहे. दरम्यान, महासभेत अडचणीचे विषय असल्याने गणसंख्येचे कारण पुढे करीत महापौरांंनी महासभा रद्द केल्याचा आरोप मनसेने केला आहे.
महापौर राणे म्हणाल्या की, शुक्रवारी ११ वाजता होणाऱ्या सभेला १२ वाजेपर्यंत सदस्य आले नाहीत. केवळ २८ सदस्य उपस्थित होते. त्यामुळे सभा रद्द करावी लागली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने ही महासभा होणार होती. त्याचबरोबर माजी महापौर कल्याणी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्याचा विषय होता. त्यासंदर्भात सदस्यांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले. दरवेळेस सदस्य वेळेवर येत नाहीत. त्यामुळे सभा सुरू होण्यास विलंब होतो. काही सदस्य केवळ हजर असल्याची सही करून निघून जातात. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी ते नसतात. सभेसाठी महापालिकेचे प्रशासन सज्ज असते. सभा रद्द झाल्याने त्यांचाही दिवस वाया जातो. एरव्ही, सभेच्या दिवशी लक्षवेधी व सभा तहकुबीच्या सूचना मांडल्या जातात. त्याचे प्रमाण जास्त असते. सभेच्या पटलावरील कामकाज सुरू होण्यास सायंकाळी ६ ते ७ वाजतात. अनेक वेळा सभा तहकूब केली जाते. सभेचे कामकाज सुरळीत होत नाही. सदस्यांनी सभेविषयी गांभीर्याने वागणे अपेक्षित आहे.
त्यांची ही बेपर्वाई खपवून घेण्याजोगी नाही.दरम्यान, मनसेचे गटनेते मंदार हळबे म्हणाले की, माजी महापौर कल्याणी पाटील यांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला. त्यामुळे महासभेत विरोधी पक्ष आरोग्य प्रशासनाला लक्ष्य करणार होते. निवडणुकीच्या तोंडावर भाजप व शिवसेनेने विकासकामांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. या सगळ्या मुद्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणार होते. ही सभा अडचणीची असल्याने गणसंख्येचे कारण पुढे करीत महापौरांनी सभा रद्द केली आहे.
दरम्यान, आरोप करणारे मनसेचे गटनेते व त्यांच्या पक्षाचे अन्य सदस्य ११ वाजता सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी हा आरोप करणे कितपत योग्य आहे, असा प्रतिटोला महापौर राणे यांनी लगावला आहे.कामगार संघटनेची गांधीगिरीकेडीएमसीच्या कामगारांना सातवा वेतन आयोग देण्याचा विषय मंजुरीसाठी शुक्रवारी महासभेच्या विषय पटलावर घेतलेला नव्हता. हा विषय घेण्यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने ११ सप्टेंबरला महापालिका आवारात घंटानाद आंदोलन केले होते. त्याची आठवण करून देत संघटनेचे उपाध्यक्ष रवी पाटील, प्रकाश पेणकर व कामगारांनी प्रत्येक सदस्याला गुलाबपुष्प देऊन शुक्रवारी गांधीगिरी केली. यावेळी महापौर राणे व शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे यांना गुलाबपुष्प देण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांनी कामगारांकडून ते स्वीकारले नाही. नगरसेवक राणे यांनी कामगारांसह संघटनेच्या नेत्यांना सुनावले की, प्रशासन व लोकप्रतिनिधी कामगारांच्या विषयात आडकाठी कधी करीत नाही. सगळे विषय प्राधान्याने मंजूर केले जातात. कामगारांनी त्यांना दिलेले काम व जबाबदारी चोखपणे बजावली.