ठाणे - सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सक्षम करणाऱ्या तसेच मेट्रो प्रकल्पाला पुरक ठरणारी वैयक्तीक जलद वाहतूक यंत्रणा अर्थात पीआरटीएस प्रकल्प राबविण्याबाबतची अनुकुलता महपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दर्शविली असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठीची प्रक्रि या करण्यात येणार आहे. त्यानुसार आता येत्या महासभेत या संदर्भातील सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने ही सेवा कितपत फायदेशीर ठरणार या संदर्भातील सुसाध्यता अहवाल तयार केला जाणार आहे. ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चालना दिल्यानंतर आता पीआरटीएस या महत्वांकाक्षी प्रकल्पाला चालणा देण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. फेबु्रवारी महिन्यात आयुक्तांनी ही संकल्पना पुढे आणली होती. त्यानंतर ही सेवा कळवा, मुंब्रा आदी भागांसाठी देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. अंतर्गत मेट्रोबरोबरच पीआरटीएसची मार्गिकेचे कामही एकाच वेळेस सुरु करण्याचा पालिकेचा मानस आहे. अतिशय कमी जागेत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असून या वाहनाची क्षमता कमीत कमी आणि जास्तीत जास्त ६ व्यक्ती बसतील एवढी आहे. ड्रायव्हरविरहित लेसरवर आधारीत तंत्रज्ञानावर आधारीत ही यंत्रणा आहे. त्याचप्रमाणे पीआरटीएसचा ट्रॅकही प्रीफॅब्रिकेटेड पद्धतीने कमी वेळात बनविता येऊ शकणार आहे. महाराष्ट्र मेट्रोतंर्गत वडाळा ते कासारवडवली या दरम्यान मेट्रो धावणार आहे. त्याचबरोबर अंतर्गत मेट्रोची मार्गिका अंतीम करून त्या मार्गिकेला पीआरटीएस जोडल्यास प्रवाशांना मेट्रो पकडण्यासाठी जी पायपीट करावी लागणार आहे ती पूर्णत: थांबणार आहे. दरम्यान मेट्रोची मार्गीका ही घोडबंदर रोडवरून कासारवडवलीपर्यंत असल्याने कळवा आणि मुंब्रा याठिकाणच्या प्रवाशांना पीआरटीएसचा फायदा होणार आहे. अंतर्गत मेट्रोच्या मार्गिकेला पीआरटीएसची मार्गिका जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना दुहेरी फायदा होणार आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहे.
पीआरटीएस प्रकल्पाला मिळणार चालना, सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव महासभेच्या पटलावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 2:39 PM
ठाणे महापालिकेने सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आता पीआरटीएसची अनोखी संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार या संदर्भातील सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
ठळक मुद्देकमी वेळेत होणार जलद प्रवाससहा प्रवासी बसण्याची क्षमता