ठाणे : राष्ट्रवादी काँग्रसचे वर्चस्व असलेल्या बाजार समित्या बरखास्त करण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस एकत्र आले. त्यांनी शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची मुभा दिली. त्याविरोधात बाजार समित्यांनी बेमुदत बंद पुकारला. मात्र या राजकीय साठमारीत बळी जातोय तो ग्राहकांचा. या बंदच्या नावाखाली बाजार समितीचा संबंध नसलेल्या बाजारपेठांतही भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. ठाण्यात मोजका माल वाशीच्या बाजारपेठेतून येतो. काही नाशिकहून येतो, पण तरीही बंदचे कारण सांगत किरकोळ बाजारातील दर सतत वाढत आहेत. पाऊस लांबला तेव्हा पुरेशी आवक नसल्याचे कारण देत भाज्यांच्या दरांनी शंभरी गाठली होती. आताही बंदमुळे आवक नसल्याचे सांगत पुन्हा भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. शेवग्याच्या शेंगा, मटार आणि हिरव्या मिरच्यांनी तर दरात डबल सेंच्युरी मारली आहे. त्याचवेळी पालेभाज्यांनी मात्र थोडा दिलासा दिल्याचे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. गेले दोन महिने भाज्यांच्या दरात सतत चढ-उतार होत आहे. ४०, ६०, ८० रूपये किलोच्या दरांत असलेल्या भाज्यांनी थेट दराची शंभरी ओलांडली आहे. स्वयंपाकघरात हक्काचे स्थान पटकावलेला टोमॅटो दरामुळेच लालबुंद झाला आहे. त्यानेही किलोमागे २० रूपयांनी भाव वाढवून घेतला आहे. त्याचवेळी पावसाचा आधार मिळाल्याने पालेभाज्यांचे दर मात्र आटोक्यात आहेत. मेथीची जुडी आकारानुसार ३० ते ४० रूपयांच्या घरात आहे. त्याचवेळी कोथिंबीरीचा गेल्या महिन्यातील तोरा उतरला असून तिची मोठी जुडी ४० रुपयांच्या दरम्यान आहे.
राजकीय साठमारीत सर्वसामान्य ग्राहकांचे हाल
By admin | Published: July 13, 2016 1:56 AM