नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे स्थगित असलेल्या भिवंडी तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक १३ ऑक्टोबर रोजी होणार असून त्या संबंधी कार्यक्रमाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अधिक पाटील यांनी मंगळवारी जाहीर केली आहे.
भिवंडी तालुक्यातील गोरसाई,सावंदे,पाये,ब्राह्मण गाव, मोहंडूळ,अंबाडी,घोटगाव,कवाड,गाणे,चाणे,गणेशपुरी,पारीवली,खडकी बुद्रुक, दाभाड, दिघाशी, पालखणे, कुंदे, मालबिडी, मोहिली, मैंदे, पिळझें, शिरोळे, सुपेगाव, पाच्छापूर, वेढे, खरीवली, एकसाल, केल्हे, दुधनी, पिंपळघर, चिंबीपाडा या एकूण ३१ ग्रामपंचायतीं मध्ये २९७ ग्रामपंचायत सदस्य व ३१ थेट सरपंच निवडी करीता १३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.या निवडणुकीची नोटीस तहसीलदार पाटील यांनी मंगळवारी जाहीर केली आहे.
२१ ते २७ सप्टेंबर दरम्यान शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस वगळून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून २८ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे.अर्ज मागे घेण्यासाठी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजे पर्यंत वेळ देण्यात आली असून त्यानंतर त्याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. तर १३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजे पर्यंत मतदान पार पडणार आहे.शहरातील कामतघर येथील वऱ्हाळादेवी माता मंगल भवन येथे १४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून याच ठिकाणी निवडणुकीसंदर्भातील सर्व शासकीय कामकाज प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी मंगळवारी दिली आहे.