मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेची महासभा उद्या २४ डिसेंबर रोजी अखेर ऑनलाइनच होणार आहे . विशेष म्हणजे १ डिसेंबर रोजीची महासभा हि ऑफलाईन घ्या म्हणून तहकूब करणाऱ्या महापौरांनीच ऑनलाईन सभा घेण्यास मंजुरी दिली आहे . तर आयुक्तांनी शासना कडून ऑफलाईन सभे बाबत मागवलेले मार्गदर्शन अजून आलेले नाही त्यामुळे ऑफलाईन सभा घेण्यावरून नगरसेवक बॅकफूटवर आल्याचे मानले जाते .
कोरोना संसर्गाचा ओमायक्रोन ह्या आफ्रिकी व्हेरियंटच्या येण्याने १ डिसेंबर रोजी ऑफलाईन आयोजित केलेली महासभा ही अचानक ओनलाईन घेण्यात आली होती. त्या ऑनलाईन सभेत सत्ताधारी भाजपा सह शिवसेना , काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील ऑफलाईन सभा घेण्यास सहमती दर्शवली होती . ऑनलाईन सभेत नगरसेवकांना आणि त्यातही विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलू दिले जात नाही असा आरोप सातत्याने होत होता . विरोधीच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील नगरसेवकां मध्ये देखील महासभेत बोलायला मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत होती . ऑनलाईन महासभेत मत मोजणीत गैरप्रकार होत असल्याचे आरोप होत होते . कारण नगरसेवकांचे मत न घेता गटनेत्याने सांगितले त्या संख्ये नुसार मतदान घेतले जात असल्याने ते नियमाला धरून नसल्याचे आरोप झाले .
दरम्यान १ डिसेंबर रोजी ऑनलाईन महासभेत सत्ताधारी भाजपा सह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी ऑफलाईन महासभेची मागणी केली . ऑफलाईन महासभेसाठी पुरेशी पर्यायी जागा बघावी अशी भूमिका घेत महासभा तहकूब करण्यात आली होती . ऑफलाईन सभेवरून प्रशासना विरुद्धच्या आक्रमक भूमिके नंतर आयुक्त दिलीप ढोले यांनी देखील ऑफलाईन महासभा खाजगी जागेत घ्या बाबत राज्याच्या नगरविकास विभाग कडे पत्र पाठवून मार्गदर्शन मागवले होते.
यापूर्वी खाजगी जागेतमहासभा व इतर सभा घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे खाजगी जागेत महासभा घेणे खर्चिक ठरेलच शिवाय ते नियमा नुसार ठरेल कि नाही ? या बाबत मार्गदर्शन करण्याची विनंती प्रधान सचिवांना केली होती . कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरियंट मुळे फक्त ऑनलाईन महासभा, स्थायी समिती सभा घेणे योग्य होईल अशी भूमिका देखील आयुक्तांनी स्पष्ट केली होती .
शासनाकडून महासभा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घ्या बाबत अजून मार्गदर्शन आलेले नसले तरी १ डिसेंबर रोजी तहकूब केलेली महासभा शेवटी ऑनलाईन घेण्यावर महापौरांसह सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमती दर्शवत ऑफलाईन सभा घेण्यावरून बॅकफूटवर आल्याचे मानले जात आहे .