पंकज पाटील
बदलापूर : बदलापूरच्या चामटोली परिसरात महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकलेली असताना सर्व सरकारी यंत्रणा ही प्रवाशांचे जीव वाचवण्यात मग्न होती. अशा महापुरातही आपल्या जीवाची पर्वा न करता एका प्राणिमित्राने तब्बल २५ प्राण्यांचे जीव वाचवले. या प्राणिमित्राचा अपंग प्राण्यांसाठी अनाथाश्रम असून याच आश्रमात एकूण ४५ प्राणी उपचार घेत होते. त्यातील २५ जणांचे जीव वाचले असून उर्वरित प्राण्यांपैकी काही प्राणी स्वत: धडपड करून सुरक्षितस्थळी गेले. काही प्राणी या महापुरात वाहून गेले.
ज्या भागात महालक्ष्मी अडकली होती, त्याच परिसरात रेल्वेमार्गाला लागून पानवठा फाउंडेशनचे प्रमुख गणराज जैन अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम चालवतात. अपघातात जखमी झालेले आणि अपंगत्व आलेल्या प्राण्यांचा सांभाळ ते करतात. त्यांच्या या आश्रमात ४५ विविध प्राणी उपचार घेत होते. २६ जुलै रोजी रात्री पाण्याची पातळी वाढत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या आश्रमातील प्राण्यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम सुरू केले. रात्री ११ पासून त्यांचे हे काम सुरू होते. आश्रम हा रेल्वेमार्गाच्या पलीकडे असल्याने त्यांना प्राण्यांना हलवण्यात अडचणी येत होत्या.प्राण्यांचे स्थलांतर सुरू असतानाच पाण्याची पातळी अचानक वाढली. तोपर्यंत २५ प्राण्यांना हलवण्यात आले होते. मात्र, पाणी धोकादायक पातळीच्यावर गेल्यावर स्थानिक ग्रामस्थांनीच त्यांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. पाण्याची खोली आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना रोखले गेले, तरी त्यांनी आश्रमातील २० प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी पुन्हा पाण्यात उडी मारून पाण्यापर्यंत पोहोचले. मात्र, त्या वेळेस सर्वच प्राण्यांना आणणे शक्य नसल्याने त्यांनी बांधलेल्या प्राण्यांची सुटका केली. तसेच लहान प्राण्यांना देवाच्या भरवशावर तेथेच सोडण्याची वेळ जैन यांच्यावर आली.काही प्राण्यांना त्यांनी उंच ठिकाणी ठेवले. तर, जखमी माकडालाही आश्रमाच्या पत्र्यावर ठेवत जैन हे पुन्हा सुरक्षितस्थळी आले. मात्र, येताना पुन्हा त्यांनी दोन जखमी श्वानांना आपल्या खांद्यावर आणले. जैन यांनी पहाटे ४ पर्यंत या प्राण्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याची पातळी वाढल्याने त्यांना पुढे काही करता आले नाही. मात्र, या पावसात वाहून गेलेल्या २० पैकी सात प्राणी हे पुन्हा आश्रमात आले आहेत. मात्र, या प्राण्यांची अवस्था बिकट आहे. अजूनही हे प्राणी भेदरलेल्या अवस्थेत आहे. या पुरात एक घोडी आणि तिचा बछडा वाहून गेला आहे. या घोडीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून त्या घोडीचे पिलू मात्र बचावले आहे. वाहून गेलेल्या इतर प्राण्यांचे मृतदेह सापडले असून अजूनही १० ते १२ प्राणी बेपत्ता असल्याचे जैन यांनी स्पष्ट केले.या पुरात आश्रमाचीही दुरवस्था झाली आहे. असे असले तरी पुन्हा नव्याने हा आश्रम उभारण्यात येईल. अनेक व्यक्ती या कामात हातभार लावतील. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेली साथ ही महत्त्वाची आहे. - गणराज जैन, प्राणिमित्र