ठाणे : ठाणे महानगरपालिकेने नितीन जंक्शन येथे बांधलेल्या नितीन सब वे भुयारी मार्गाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमावेत. दैनंदिन स्वच्छता तसेच भुयारी मार्गात लोंबकळणाऱ्या विद्युतवाहिन्या आदी कामे येत्या १५ दिवसांत तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बुधवारी पाहणी दौऱ्यादरम्यान प्रशासनाला दिले.या वेळी माजी महापौर नगरसेवक अशोक वैती, संतोष वडवले, नगरसेविका निर्मला कणसे, प्रभा बोरिटकर, नगरअभियंता रतन अवसरमोल, सुरक्षा अधिकारी सुनील मालवणकर, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, रामदास शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेच्या माध्यमातून नितीन सब वे भुयारी मार्ग बांधण्यात आला. परंतु, सध्या या मार्गात नागरिकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्यामुळे गर्दुल्ले, भिकारी यांचे साम्राज्य असते. या ठिकाणी असलेल्या विद्युतवाहिन्या या तुटलेल्या अवस्थेत असून सर्वच ठिकाणी अस्वच्छता असल्याबाबतच्या तक्र ारी नागरिकांना केल्या होत्या. त्यानुसार, हा पाहणी दौरा आयोजिला होता. या वेळी या ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले, तसेच सर्वत्र विद्युतवाहिन्या निखळलेल्या असून भुयारी मार्ग कोणत्या दिशेने बाहेर पडतो, याचे दिशादर्शक फलकही नसल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणच्या विद्युतवाहिन्या तातडीने दुरुस्त करून त्या बंदिस्त कराव्यात तसेच येथील सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षक नेमावेत, जेणेकरून या ठिकाणी गर्दुल्ले व भिकारी येणार नाही. या ठिकाणचे सीसीटीव्ही कंट्रोल हे नितीन कंपनी येथील अगिनशमन विभागात ठेवावे, अशा सूचना सुरक्षा अधिकाऱ्यांना महापौरांनी दिल्या. कामात कुचराई करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे संकेतही त्यांनी या वेळी दिले. (प्रतिनिधी) देखभाल कोण करणार?ठाणे शहरात नागरिकांसाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक वास्तू बांधल्या आहेत. परंतु, लोकार्पण केल्यानंतर अधिकारी त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याने कालांतराने त्या पांढरा हत्ती बनू लागल्याचे पाहणीदौऱ्यादरम्यान निदर्शनास येत आहे.
भुयारी मार्गाच्या दुरुस्तीचे काम १५ दिवसांत करा
By admin | Published: March 30, 2017 6:30 AM