ऑनलाइन सुविधा : नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रेल्वे, हवाई प्रवासासह मॉलमध्ये प्रवेशासाठी आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पास आवश्यक आहे. हा पास प्रत्येकाला स्वत: ऑनलाइनद्वारे काढता येतो.
अनेक नागरिकांनी हा पर्याय निवडला आहे. मात्र, युनिव्हर्सल पास मिळाल्यावर तो कसा व कुठे वापरायचा, तसेच रेल्वे प्रवासात पुन्हा लसीच्या दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, आदी कागदपत्रांची पडताळणी होईल का, त्यासाठी ही कागदपत्रे जवळ बाळगावी लागणार का, आदी प्रश्न अनेकांना आहेत. त्यामुळे याबाबत जनजागृतीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पासमुळे मॉलमध्येही प्रवेश मिळणार आहे. मात्र, मॉलचालकांनाही याबाबत पूर्णपणे माहिती नाही. दुसरीकडे हा पास असणाऱ्यांपैकी अनेक जण अजूनही मॉलमध्ये गेलेले नसल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान, केंद्र, राज्य शासनाने युनिव्हर्सल ट्रॅव्हल ई-पासची सुविधा दिली असली तरी अजूनही बरेच नागरिक या सुविधेबाबत अनभिज्ञ आहेत. हा पास कसा काढायचा, त्याचे लाभ कोणी घ्यावा, याबाबत मार्गदर्शन होण्याची गरज असल्याचे नागरिक, संबंधित अधिकारी, कर्मचारी, आदींनी व्यक्त केली.
---------------------
जिल्ह्यात दोन्ही डोस घेतलेले किती?
जिल्ह्यातील अपेक्षित लसीकरण : ९९,४२,४०७
आतापर्यंत दोन्ही डोस झाले : २६,५३,४४१
पहिला डोस घेतलेले नागरिक : १८,७१,६६७
दुसरा डोस घेतलेले नागरिक : ७,८१,७७४
पहिला डोस घेतलेली टक्केवारी : ४२ टक्के
दुसरा डोस घेतलेली टक्केवारी : ४० टक्के
---------------------------
असा मिळवा ई-पास
१. पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.
२. त्यातील ‘ट्रॅव्हल पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.
३. त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाईल क्रमांक नमूद करावा. लगेचच मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस)द्वारे प्राप्त होईल.
४. हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक, आदी तपशील आपोआप समोर दिसतील.
५. त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
६. त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक, आदी सर्व तपशील आपोआप दिसेल.
७. या तपशीलामध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येऊ शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.
८. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस)द्वारे लिंक प्राप्त होईल.
९. लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाईलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.
----------------