ठाणे : काँग्रेसचे गटनेते संजय घाडीगावकर यांचा महासभेत मतप्रदर्शन करण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देऊन त्यांना सभागृहातील कामकाजात सहभागी होता येत नसल्याचा दावा करून त्यांच्या सहभागाला शिवसेनेने आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु, पीठासीन अधिकारी महापौर संजय मोरे यांनी त्यांना सभागृहात मत प्रदर्शित करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय दिला. यामुळे अखेर घाडीगावकर यांनी सभागृहच सोडले.शनिवारच्या महासभेत शिवसेनेचे स्वीकृत सदस्य विकास रेपाळे यांनी घाडीगावकर यांच्या जातपडताळणी खटल्याचा दाखला सभागृहात दिला. या खटल्यातील निकालानुसार त्यांना सभागृहात मत प्रदर्शित करता येत नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, त्यांच्या या दाव्याला विरोधी पक्षातील नारायण पवार, मनोज शिंदे आदींनी आक्षेप घेतला. न्यायालयीन प्रकरण असल्याने त्याबाबत सभागृहात चर्चा करणेच योग्य नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. तर, भाजपाचे मिलिंद पाटणकर यांनी सभागृहाच्या एका वरिष्ठ नगरसेवकाला त्याच्या न्यायालयीन कामकाजाबाबत अशी अचानक विचारणा करणे चुकीचे असल्याचे सांगितले. मात्र, या विषयावरून गोंधळ वाढत गेल्यानंतर महापौर संजय मोरे यांनी अंतिम निवाडा देताना घाडीगावकर सभागृहात उपस्थित राहू शकतात. परंतु, कोणत्याही विषयावर मत देऊ शकत नाहीत, तसेच मतप्रदर्शन करू शकत नसल्याचा निर्णय दिला. त्यानंतर, घाडीगावकर सभागृहातून निघून गेले. त्याच वेळी त्यांनी न्यायालयाच्या संबंधित विषयावर शनिवारी झालेल्या चर्चेच्या इतिवृत्ताची मागणी सभागृहात केली. न्यायालयाचा आदेश वेगळा असताना त्याचे वेगळे अर्थ काढून आपल्यावर अन्याय होत असल्याने या प्रकरणात चुकीचा अर्थ लावणाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला. (प्रतिनिधी)
घाडीगावकरांचा हक्क हिरावला
By admin | Published: November 22, 2015 2:49 AM