ठाणे : चार महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून पक्षात दाखल झालेले भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय घाडीगावकर यांनी स्थानिक राजकारणाला कंटाळून भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्यासमवेत अपक्ष नगरसेविका स्वाती देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांनीदेखील भाजपा सोडली असून आता घाडीगावकर हे चार पॅनलमधून १६ उमेदवार उभे करणार आहेत. पक्ष सोडण्यापूर्वी त्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीवर राजकीय आर्थिक हितसंबंध जपल्याचे आरोप केले आहेत.काँग्रेसच्या राजवटीला कंटाळून घाडीगावकर यांनी काँग्रेस सोडली होती. त्यानंतर, त्यांच्या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून स्वाती देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्या या निवडणुकीत विजयी झाल्या. चार महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर, वागळे पट्ट्याची संपूर्ण जबाबदारीही त्यांना देण्यात आली होती. येथील उमेदवार ठरवण्याचे अधिकारही त्यांना देण्यात आले होते. असे असतानादेखील भाजपाने आता उमेदवारांची जी संभाव्य यादी जाहीर केली, त्यात केवळ पाचजणांनाच संधी दिली. त्या ठिकाणी इतर जे उमेदवार देण्यात आले, ते अतिशय कमकुवत दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्ती प्रभागातच राहत नाहीत त्यांना उमेदवारी दिल्याचा आरोप त्यांनी केला. या चारही पॅनलमध्ये कमकुवत उमेदवार देऊन भाजपाने इतर पक्षांबरोबर आपले आर्थिक आणि राजकीय हितसंबंध जपल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.तिकीट मागितले नसतानाही केवळ माझी मनधरणी करून इतर ठिकाणी आपले हितसंबंध जपण्याचा स्थानिक भाजपाकडून प्रयत्न झाल्याचेही ते म्हणाले. यामुळेच आपण भाजपाला सोडचिठ्ठी देत असून प्रभाग क्र. १५, १६, १७, १८ आणि १९ मध्ये मी अपक्ष उमेदवार देणार असून स्वत:ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. माझ्या वाटेत कोणी राजकीय मंडळी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लुडबुड केल्यास सर्वांचे प्रत्येक आठवड्याला वस्त्रहरण केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांकडे दिलेल्या ठाण्यातील भ्रष्टाचाराच्या ग्रंथाची एक महिन्याच्या आत चौकशी पूर्ण करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. (प्रतिनिधी) - दरम्यान, अचानक आक्रमक होऊन अशा पद्धतीने त्यांनी स्थानिक भाजपा नेतृत्वावर घणाघाती आरोप केल्याने पक्ष आता वागळे पट्ट्यात बॅकफुटवर जाणार असल्याचे चित्र आहे. घाडीगावकर यांच्या निमित्ताने शिवसेनेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार शिरकाव करण्याची मोठी संधी भाजपाला होती. परंतु, ती संधी पक्षाने गमावली आहे.घाडीगावकर यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर याचा फायदा उचलण्यासाठी मनसेने त्यांना प्रवेशाची आॅफर दिली आहे, अशी माहिती मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
घाडीगावकरांची भाजपाला सोडचिठ्ठी
By admin | Published: February 03, 2017 2:06 AM