अजित मांडकेठाणे : आधीच महापालिकेने ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे १,०२४ बेडचे रुग्णालय उभारल्यानंतर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर, कळवा-मुंब्य्रातही एक हजार बेडचे रुग्णालयाचे काम म्हाडाने सुरू केले आहे. याशिवाय, भविष्यात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली, तर बेड कमी पडू नयेत म्हणून शहराच्या विविध भागांत आणखी पाच ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्याचा घाट घातला आहे. सध्या शहरातील विविध रुग्णालयांत १,२०० बेड रिकामे असताना महापालिका, म्हाडा, सिडको, खाजगी संस्था व एमएमआरडीएच्या माध्यमातून चार हजार ३३७ बेडच्या या रुग्णालयांवर कोट्यवधींचा खर्च कशासाठी, असा सवाल ठाणेकर करीत आहेत. ठामपाने मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच ती उभारत असल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाणे शहरात आजघडीला कोरोनाबाधित प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १,७८३ इतकी आहे. शिवाय, आता घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्याही यात अधिक आहे. त्यामुळे शहरातील विविध कोविड रुग्णालयांतील १,२०० हून अधिक बेड रिकामे आहेत. महापालिकेच्या पहिल्या कोविड केअर सेंटरमध्येही तब्बल ६०० हून अधिक बेड रिकामे असल्याचे पालिकेच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात घेतलेल्या कर्मचाºयांचे तीन महिन्यांचे पगारही अद्याप मिळू शकलेले नाहीत. महिनाभरात बाधितांची संख्या आणखी कमी होईल, असा दावा करण्यात येत आहे. असे असताना दोन दिवसांपूर्वी कळवा, मुंब्रा येथे सुमारे एक हजार बेडच्या रुग्णालयाचे काम म्हाडाने सुरू केले असून त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केले आहे.
दरम्यान, आता शहरात आणखी म्हाडा, सिडको, खाजगी संस्था, महापालिका आदींच्या माध्यमातून नवी रुग्णालये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ग्लोबल इम्पॅक्ट हब येथे आजही तज्ज्ञ डॉक्टर आणि इतर मनुष्यबळाची कमतरता आहे. असे असताना, इतर ठिकाणी मनुष्यबळ कसे पुरविणार, त्यांच्यावरील खर्च कसा उभा करणार, असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत....तर बेड कमी पडणार नाहीतभविष्यात कोरोनाची पुन्हा दुसरी लाट येऊ शकते. यामुळे ती आल्यास, बेडची कमतरता रुग्णांना भासू नये, यासाठी ही तयारी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिलेली तशा स्वरूपाची तयारी करून ठेवण्यास सांगितले आहे. त्यानुसारच हे काम सुरू आहे. - संदीप माळवी,उपायुक्त, ठामपा